ग्रंथालयांकडून निधी योजनेंतर्गत प्रस्ताव आमंत्रित
By admin | Published: August 24, 2014 11:36 PM2014-08-24T23:36:45+5:302014-08-24T23:36:45+5:30
भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्याद्वारे शासनमान्य ग्रंथालयांसाठी समान व असमान निधी योजनेमधून अर्थसहाय्य करण्यात येते.
गोंदिया : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्याद्वारे शासनमान्य ग्रंथालयांसाठी समान व असमान निधी योजनेमधून अर्थसहाय्य करण्यात येते. सदर अर्थसहाय योजनेचे नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक शासनमान्य ग्रंथालयांनी योजनेच्या लाभासाठी ३० आॅगस्टपर्यंत इंग्रजी/हिंदी भाषेतील प्रस्ताव तीन प्रतीत जिल्हा ग्रंथालयाकडे सादर करावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी खु.भै. बोपचे यांनी केले आहे.
समान निधी योजनेंतर्गत ग्रंथालयांना परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग, ग्रंथ प्रदर्शनी तसेच सार्वजनिक ग्रंथालयांना ईमारत विस्तार/बांधणीसाठी तसेच फिरते ग्रंथालयासाठी अर्थसहाय करण्यात येते. यामध्ये राज्यशासनाचे ५० टक्के व प्रतिष्ठानचे ५० टक्के अर्थसहाय्य आहे.
असमान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामुग्री, फर्निचर, ईमारत बांधकाम व ईमारत विस्तार यासाठी प्रतिष्ठानकडून ७५ टक्के अर्थसहाय्य दिले जाते व २५ टक्के रक्कम संबंधित ग्रंथालयाला खर्च करावी लागते. सार्वजनिक ग्रंथालयातील बाल, महिला, जेष्ठ नागरिक, नवसाक्षर, स्वतंत्र स्पर्धा परीक्षा विभाग तयार करण्यासाठी प्रतिष्ठानच्यावतीने १०० टक्के अर्थसहाय करण्यात येते. ग्रंथालयांना त्यांचे महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी १०० टक्के अर्थसहाय, शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तिसाठी अर्थसहाय करण्यात येते. असे ग्रंथालय संचालक सु.हि. राठोड यांनी कळविले आहे.