लोकल, पॅसेंजर सुरू करण्यासाठी भाकपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:36 AM2021-09-16T04:36:50+5:302021-09-16T04:36:50+5:30
सौंदड : कोरोना संसर्गामुळे रेल्वेने मागील दीड वर्षापासून पॅसेंजर आणि लोकल गाड्या बंद केल्या आहेत. आता परिस्थिती पूर्वपदावर आली ...
सौंदड : कोरोना संसर्गामुळे रेल्वेने मागील दीड वर्षापासून पॅसेंजर आणि लोकल गाड्या बंद केल्या आहेत. आता परिस्थिती पूर्वपदावर आली तरी पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करण्यात आल्या नाही. या गाड्या त्वरित सुरू करण्यात याव्यात, या मागणीला घेऊन भाकपच्या वतीने बुधवारी दुपारी १२ वाजता सौंदड येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकल आणि पॅसेंजर गाड्या या परिसरातील छोटे-माेठे विक्रेते, भाजीपाला विक्रेते आणि गोरगरीब प्रवाशांसाठी एक प्रकारच्या जीवनदायिन्या आहेत. मागील दीड वर्षापासून गोंदिया-बल्लारशा, गोंदिया-बालाघाट-कटंगी या पॅसेंजर आणि लोकल गाड्या बंद आहेत; यामुळे या भागातील प्रवाशांना तिप्पट तिकीट मोजून बसने प्रवास करावा लागत आहे. अनेकांचा रोजगारदेखील हिरावला आहे. रेल्वे विभागाने विशेष गाड्यांची संख्या वाढविली असली तरी या गाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे. मग केवळ पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू केल्यानेच कोरोनाचा संसर्ग होतो का, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. या गाड्या सुरू करण्यात याव्या, यासाठी अनेकदा रेल्वे विभागाला निवेदन देण्यात आले. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे भाकपने बुधवारी सौंदड येथे धरणे आंदोलन करून याकडे रेल्वे विभागाचे लक्ष वेधले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवकुमार गणवीर, डॉ. महेश कोपूलवार, देवराव चवरे, हौसलाल रहांगडाले, मिलिंद गणवीर, रामचंद्र पाटील, करुणा गणवीर, हिवराज उके, सदानंद इलमे, विनोद झाेडगे, शालू कुथे, मीनाक्षी बोंबर्डे, चत्रुघन लांजेवार, कल्पना डोंगरे यांनी केले.
..................
.... तर रेल रोको आंदोलन करणार
रेल्वे विभागाने येत्या १५ दिवसांत गोंदिया-बल्लारशा, गोंदिया-बालाघाट मार्गावरील लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुरू न केल्यास या मार्गावरील प्रत्येक रेल्वेस्थानकावर रेले रोको आंदोलन करण्याचा इशारा भाकपने रेल्वे विभागाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.