मजीप्राने केले १० दलघमी पाण्याचे आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:18 AM2021-02-19T04:18:11+5:302021-02-19T04:18:11+5:30
कपिल केकत (लोकमत विशेष) गोंदिया : उन्हाळ्यात गोंदिया शहरातील पाणीटंचाई बघता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सन २०१७-१८ पासून पुजारीटोला प्रकल्पातून ...
कपिल केकत (लोकमत विशेष)
गोंदिया : उन्हाळ्यात गोंदिया शहरातील पाणीटंचाई बघता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सन २०१७-१८ पासून पुजारीटोला प्रकल्पातून आणी आणण्याचा प्रयोग करीत आहे. त्यानुसार, यंदाचा उन्हाळा लक्षात घेत महराष्ट्र जीवन प्राधिकरणने आतापासूनच पुजारीटोला प्रकल्पातील १० दलघमी पाण्याचे आरक्षण करून ठेवले आहे. उन्हाळ्यात गोंदिया शहराला पाणीटंचाई भासल्यास पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून हे आरक्षण करण्यात आले आहे.
मागील वर्षी पावसाने चांगलीच साथ दिल्याने स्थिती जास्त कठीण झाली नसून यंदा प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे. प्रकल्पात पुरेपूर पाणीसाठा असल्यामुळे यंदा रबीसाठी सिंचनाची सोयही पाटबंधारे विभागाकडून करण्यात आली आहे. मात्र, सन २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे परिस्थिती कठीण झाली होती. या काळात जिल्ह्याला दुष्काळी परिस्थितीशी सामना करावा लागला होता. त्यातही कधी न घडलेली घटना याकाळात घडली होती व ती अशी की, गोंदिया शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी डांगोरली येथील वैनगंगा नदीत पाणी उरले नव्हते. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पातून डांगोरली येथील वैनगंगा नदीत पाणी सोडण्यात आले होते. हा प्रयोग सन २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये करण्यात आला.
तेव्हापासून आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून दरवर्षी गोंदिया शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुजारीटोला प्रकल्पातील पाण्याचे आरक्षण करून घेतले जाते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने २ वर्षे अशाप्रकारे पुजारीटोला प्रकल्पातील पाणी घेत गोंदिया शहरातील पाणीटंचाईवर मात केली होती. सन २०१९-२० मध्येही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पाण्याचे आरक्षण करून ठेवले होते. मात्र, सुदैवाने मागील वर्षी पुजारीटोलाचे पाणी आणण्याची गरज भासली नाही. मात्र, हलगर्जीपणा नको म्हणून यंदाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने आतापासूनच पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाण्याचे आरक्षण गोंदिया शहरासाठी करून घेतले आहे.
--------------------------
जिल्ह्यातील प्रकल्पांत पुरेपूर पाणीसाठा
मागील वर्षी जिल्ह्यात चांगलाच पाऊस बरसला. अतिपावसामुळे जिल्ह्याला पुराचाही सामना करावा लागला होता. यामुळे चांगलेच नुकसान झाले असतानाच प्रकल्पांत लबालब पाणी झाले होते व ते आता कामी येत आहे. यंदा प्रकल्पांत चांगले पाणी असल्यामुळे रबीसाठीही पाणी दिले जाणार आहे. सध्या जिल्ह्यातील प्रकल्पांत पुरेपूर पाणीसाठा असून रविवारची स्थिती पाहिल्यास इटियाडोह प्रकल्पात ६४.८२ टक्के, सिरपूर प्रकल्पात ७२.६७ टक्के, पुजारीटोला प्रकल्पात ५२.५९ टक्के तर कालीसरार प्रकल्पात २६.४० टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात इटियाडोह व पुजारीटोला प्रकल्पातून पाणी दिले जाते.