बिनशर्त समायोजन करा
By admin | Published: August 26, 2016 01:29 AM2016-08-26T01:29:15+5:302016-08-26T01:29:15+5:30
गेल्या ८ ते १० वर्षांपासून विविध पदांवर आणि तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य
एनआरएचएम कर्मचारी : काळ्या फिती लावून आंदोलन सुरू
गोंदिया : गेल्या ८ ते १० वर्षांपासून विविध पदांवर आणि तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाने नियमित आरोग्य सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे. त्यासाठी बुधवारपासून काळ्या फिती लावून काम करणे सुरू केले.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ शाखा गोंदियाच्या वतीने जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लढा पुकारण्यात आला आहे. अध्यक्ष सुनील तरोणे यांच्या नेतृत्वात इतर पदाधिकाऱ्यांनी बुधवारी या आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. सदर अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कामकाजाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांची नियुक्ती शासनाच्या सरळ सेवा भरतीच्या मानांकनानुसारच झालेली असल्यामुळे रिक्त जागी समकक्ष पदांवर त्यांना समायोजित करावे, अशी संघटनेची मागणी आहे. त्यासाठी राज्यस्तरावर सतत पाठपुरावा सुरू आहे. परंतू शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे शासनाचे लक्ष पुनश्च मागण्यांकडे वेधून घेण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्धार केला असल्याचे सुनील तरोणे यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
काळ्या फिती ते बेमुदत उपोषण
सदर आंदोलनाअंतर्गत एनआरएचएम कर्मचारी टप्प्याटप्प्याने आंदोलन वाढवत नेणार आहेत. त्यात २४ ते ३१ आॅगस्टदरम्यान काळ्या फिती लावून काम करणार आहेत. दि.२९ ते ३१ आॅगस्टदरम्यान जिल्ह्यातील सर्व आमदाव, खासदारांच्या घरांवर मोर्चे काढले जातील. दि.२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा, दि.१९ ला लाक्षणिक काम बंद, आॅक्टोबर महिन्यात संपूर्ण रिपोर्टींग बंद करणे, २ नोव्हेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन तर डिसेंबर किंवा जानेवारी २०१७ पासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.