जिल्ह्यात डेंग्यूपेक्षा मलेरिया जबर
By admin | Published: August 24, 2014 11:34 PM2014-08-24T23:34:39+5:302014-08-24T23:34:39+5:30
जिल्ह्यात सध्या डेंग्यू व मलेरियाचा प्रकोप सुरू आहे. गावची गावे या आजारांच्या विळख्यात अडकलेली आहेत. मलेरिया पेक्षा डेंग्यू हा गंभीर आजार असून जिल्ह्यात मात्र विपरीत परिस्थिती आहे.
हिवताप विभागाचा अहवाल : डेंग्यूने एकही नाही, मलेरियाने दोन मृत्यू
कपिल केकत - गोंदिया
जिल्ह्यात सध्या डेंग्यू व मलेरियाचा प्रकोप सुरू आहे. गावची गावे या आजारांच्या विळख्यात अडकलेली आहेत. मलेरिया पेक्षा डेंग्यू हा गंभीर आजार असून जिल्ह्यात मात्र विपरीत परिस्थिती आहे. आजही जिल्ह्यातील काही गावांत तापाचे रूग्ण आढळून येत आहेत. याबाबत मात्र हिवताप विभागाकडून जाणून घेतले असता डेंग्यूमुळे एकही नाही तर मलेरियाने मात्र दोघांचा मृत्यू झाल्याचे कळले. एकंदर जिल्ह्यात डेंग्यूपेक्षा मलेरिया जबर असल्याचे चित्र आहे.
पावसाळा म्हणजे आजारांचा काळच म्हटला जातो. त्यानूसार जून महिन्यापासून ग्रामीण भागात डासजन्य आजारांना सुरूवातही झाली. यात डेंग्यूबाबत जाणून घेतले असता, अर्जुनी मोरगाव तालुक्यात- महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील ताडगाव, केशोरी प्रा.आ. केंद्रातील राजोली, चान्ना/बाक्टी प्रा.आ. केंद्रातील शिरेगावबांध, कोरंभीटोला प्रा.आ. केंद्रातील कोरंभी, सालेकसा तालुक्यात- बिजेपार प्रा.आ.केंद्रातील कोटरा तर आमगाव तालुक्यातील तिगाव प्रा.आ. केंद्रातील वळद या गावांत डेंग्यूची लागण आहे.
तर देवरी तालुक्यात- घोनाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील म्हैसुली, ककोडी प्रा.आ. केंद्रातील रेहाडी, घोनाडी प्रा.आ. केंद्रातील श्रीधरटोला, गोरेगाव तालुक्यात- सोनी प्रा.आर. केंद्रातील हिरडामाली, तिल्ली मोहगाव प्रा.आ. केंद्रातील गोवारीटोला तर सालेकसा तालुक्यात दर्रेकसा प्रा.आ. केंद्रातील डुंबरटोला व बिजेपार प्रा.आ. केंद्रातील सिंधीटोला या गावांत मलेरियाची लागण झाली आहे. शिवाय गोंदिया तालुक्यात- रावणवाडी प्रा.आ. केंद्रात नागरा, दवनीवाडा (ता.गोंदिया) व सडक अर्जुनी तालुक्यात खोडशिवनी प्रा.आ. केंद्रातील फुटाळा गावांत इतर तापाचे रूग्ण असल्याचे विभागाकडून कळले.
विशेष म्हणजे हा प्रकार सुरू असताना विभागाने सदर गावांत आढळून आलेल्या रूग्णांचे रक्तजल नमुने नागपूरच्या मेडीकल कॉलेजमधील सेंटीनल सेंटरकडे पाठविल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सलील पाटील यांनी सांगीतले.
संपूर्ण स्थिती बघता मात्र जिल्हा आरोग्य विभाग व हिवताप विभागाच्या लचर कार्यप्रणालीमुळे हा सर्व प्रकार घडत असल्याच्या प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत.