तिसऱ्या लाटेपूर्वीचे व्यवस्थापन सुरू ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:33 AM2021-09-15T04:33:50+5:302021-09-15T04:33:50+5:30
गोंदिया : कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वत्र आरोग्य सेवेकडे पुरेसे डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ व तंत्रज्ञ नसल्याने खूप समस्यांना ...
गोंदिया : कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वत्र आरोग्य सेवेकडे पुरेसे डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ व तंत्रज्ञ नसल्याने खूप समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय आरोग्य अभियानमार्फत राज्य टास्क फोर्सच्या निदेर्शात प्रशिक्षीत केलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालयातील विशेषतज्ञ डॉक्टरांचे व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे राज्यस्तरीय दोन दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तुरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. गेडाम, प्रशिक्षक प्रा. संजय माहुले, प्रा. सिडाम, प्रा. मनोज तालपल्लीवार, प्रा. तिवारी, प्रा. सुनील देशमुख उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी वैद्यकीय अधिकारी यांनी संभावित तिसऱ्या लाटेसाठी आपण कोविड प्रतिबंधासाठी सक्षम असले पाहिजे. त्यासाठी कोरोनाचे बदलते रुप (अल्फा, डेल्टा, वगैरे), रोगप्रतिकारशक्ती कोविडची एपिडेमॉलॉजी, मायक्रोबायलॉजी व ऑक्सिजन थेरेपी व रुग्णांचे व्यवस्थापन याबाबत तज्ज्ञ टास्क फोर्सने सुचविलेला गाईडलाईन्स प्रमाणे आपण व्यवस्थापन केले तर भविष्यात निश्चितच कोरोनाचा मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल असे सांगितले.
............
ग्रामीण भागातील रुग्णांना होणार लाभ
राज्यस्तरीय कोविड प्रशिक्षणात ग्रामीण रुग्णालयाचे १५ विशेषतज्ज्ञ डॉक्टर्स व प्राथमिक आरोग्य केंद्रातून ४० वैद्यकीय अधिकारी बॅचेसमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गहन प्रशिक्षण घेत आहेत. त्याचा ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार करण्यास निश्चितच मदत होईल अशी अपेक्षा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, यांनी व्यक्त केली. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशिक्षण पथकाचे चव्हाण व त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.