अनेक गावात अवैध तेंदू फळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 09:56 PM2018-06-04T21:56:04+5:302018-06-04T21:56:04+5:30
सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रांतर्गत अनेक गावांत कंत्राटदाराने अवैध तेंदू फळ्या सुरू केल्या आहेत. या अवैध तेंदू फळ्यांची फळी मुन्सी व चेकर यांच्याजवळ डेली बुक, परमिशन, लाभार्थी पुस्तक आणि ई- टेंडरिंग कॉपी उपलब्ध नाही. सदर तेंदू फळ्या कंत्राटदाराने वनविभागाच्या संगनमताने सुरू केल्याचे बोलले जाते. याकडे वनविभागाने दुर्लक्ष केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रांतर्गत अनेक गावांत कंत्राटदाराने अवैध तेंदू फळ्या सुरू केल्या आहेत. या अवैध तेंदू फळ्यांची फळी मुन्सी व चेकर यांच्याजवळ डेली बुक, परमिशन, लाभार्थी पुस्तक आणि ई- टेंडरिंग कॉपी उपलब्ध नाही. सदर तेंदू फळ्या कंत्राटदाराने वनविभागाच्या संगनमताने सुरू केल्याचे बोलले जाते. याकडे वनविभागाने दुर्लक्ष केले आहे.
सडक-अर्जुनी वनपरिक्षेत्रांतर्गत कोसमतोंडी सहवनक्षेत्र मुरपार बिटमध्ये मुरपार ग्रामपंचायत अंतर्गत दोन तेंदू फळ्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये वनसमितीमार्फत एक तेंदू फळी सुरु आहे. तर दुसरी तेंदू फळी कंत्राटदारामार्फत सुरु करण्यात आलेली आहे. मुरपार येथे दोन तेंदू फळ्यांना वनविभागाने कशी मंजुरी दिली. एका गावात एकच तेंदू फळीची मंजुरी दिली जाते.
मुरपार येथील वन समितीकडून कुसुम ट्रेडिंग कं. गोंदिया यांना तेंदूपत्ता दिला जाणार आहे. या वनसमितीला २०२८.५८ एकर जमिनीचे जंगलाचे टेंडर झालेले आहे. याच जागेतून मजूर तेंदूपत्ता संकलन करुन या वन समितीच्या तेंदू फळीवर आणतील. उर्वरित जंगल नागझिरा व्याघ्र प्रकल्प व अभयारण्याचे आहे. या व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून मुरपार येथील दुसऱ्या अवैधरित्या सुरु असलेल्या तेंदू फळीवर तेंदूपत्ता आणला जात आहे. मुरपार येथील वन समितीकडून ११ मे २०१८ ते १३ मे २०१८ पर्यंत पहिल्यांदा फळी सुरू करण्यात आली होती. दुसºयांदा १९ ते २५ मे या कालावधीत सुरु करण्यात आली. या वन समितीमार्फत आतापर्यंत १ लाख २८ हजार ८० तेंदू पुडे खरेदी करण्यात आले आहे.
मुरपार येथील दुसरी तेंदू फळी ही अवैध असून वडेरा कंपनी गोंदिया अंतर्गत सुरु करण्यात आली आहे. ही तेंदूफळी ११ ते १३ मे २०१८ पर्यंत तसेच १९ ते २४ मे या कालावधीत सुरु करण्यात आली. या अवैध तेंदूफळीवर सुनील कांबळे रा.मुरपार हे मुन्सी असून भजनदास शहारे रा. कवडी हे चेकरचे काम पाहत आहेत. या तेंदू फळीवर सदर प्रतिनिधीने भेट दिली असता फळी मुन्सी हजर नव्हते. चेकर भजनदास शहारे हजर होते.
चेकर भजनदास शहारे यांनी सांगितले की, २२ तारखेपासून या तेंदू फळीवर आलो आहे. मला डेलीबुक, परमिशन, लाभार्थी पुस्तक याबद्दल काहीही माहीत नाही. तसेच टेंडरिंग कॉपी सुद्धा नाही. मुरपार येथील सरपंच महेश केवट यांनी सांगितले की, ही तेंदू फळी विना मंजुरीने सुरु करण्यात आली आहे. या तेंदूफळीबाबत ग्रामपंचायत कार्यालयाला सुद्धा काहीही माहीत नाही.
ही तेंदूफळी कंत्राटदाराने अवैधपणे सुरु केली आहे. या तेंदू फळीच्या मालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वनसमिती मुरपार व सरपंच महेश केवट यांनी केली आहे.
सदर प्रतिनिधीने मुरपार येथील तेंदू फळीबाबत सहवनक्षेत्र कार्यालय कोसमतोंडी येथील क्षेत्रसहायक वलथरे यांना विचारणा केली असता वलथरे यांनी सांगितले की आम्हाला तेंदूपत्ता संकलनचे कोणतेच अधिकार नाही. तसेच त्यावर देखरेख सुद्धा वनविभागाची नाही, असे आदेश आम्हाला वनविभागाकडून आहेत. त्यामुळे आम्ही काहीही सांगू शकत नाही.
सडक अर्जुनी तालुक्यात अनेक गावात अवैध तेंदू फळी सुरु करण्यात आल्या आहे. पाटेकुर्रा येथील तेंदू फळी ७, ८, ९ मे २०१८ ला सुरु झाली. या तेंदूफळीला डेलीबुक (ए-१) वनविभागाने न दिल्यामुळे तीन दिवस तेंदू फळी बंद होती.
ही तेंदू फळी गोंदिया येथील कंत्राटदाराची असून या फळीवर मुन्सी संतोष टेंभरे, चेकर कारू रहांगडाले यांच्याजवळ कोणत्याच प्रकारचे डेली बुक वनविभागाने न दिल्याचे सांगितले.
या तेंदूफळीला बीट गार्ड बी.एम. तवाडे व क्षेत्र सहायक नागपुरे डव्वा यांनी वनविभागाची डेली बुक न देता अवैध तेंदू फळी सुरु केली. पाटेकुर्रा तेंदूफळीवर तीन दिवसांत ३० हजार तेंदूपत्ता गोळा करण्यात आल्याचे फळी मुन्सी संतोष टेंभरे यांनी सदर प्रतिनिधीजवळ सांगितले. भुसारीटोला, जांभळी-दोडके, पळसगाव (डव्वा) या गावात सुद्धा वनविभागाने कोणत्याच प्रकारची मंजुरी न देता अवैध फळी गावात सुरु केल्या. या अवैध तेंदू फळ्यावर कारवाई करण्यात यावी.
चौकशी करुन कार्यवाही करा
मुरपार येथे गोंदियाच्या कंत्राटदाराने सुरु केलेली तेंदू फळी अवैध असून या फळीवर जवळपास ५० हजार तेंदूपत्ता गोळा झाले आहे. सदर फळीवर सदर प्रतिनिधीनी भेट दिली असता १९ बोद तेंदूपत्ताने भरलेले होते. या बोदावर स.ग्रा.हेटी असे लिहिले होते. मुरपार येथून हेटी ८ कि.मी. अंतरावर आहे. मुरपार येथे सुरू असलेल्या या अवैध फळीवरील बोदावर स.ग्रा. हेटी हे नाव कसे लिहिण्यात आले. ही फळी अवैध असून या फळीवरील तेंदूपत्ता जप्त करण्यात यावे. तसेच या फळीवरील तेंदू ज्या गोदामात ठेवण्यात आला त्या गोदामाची चौकशी व मोजमाप करुन कार्यवाह करण्यात यावी, अशी मागणी मुरपार येथील वन समितीचे अध्यक्ष राधेशाम कांबळे व सचिव यांनी केली आहे.