मराठीत ५० टक्क्यापेक्षा कमी गुण घेणाऱ्याला नापास समजावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 09:53 PM2019-06-09T21:53:13+5:302019-06-09T21:54:29+5:30
सर्वच शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यात अशी मागणी होत आहे. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. तर ‘लोकमत’ने हा विषय लावून धरला असून याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य असलेले लखनसिंह मोहनलाल कटरे यांची थेट मुलाखत ‘लोकमत’ने घेतली.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सर्वच शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यात अशी मागणी होत आहे. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. तर ‘लोकमत’ने हा विषय लावून धरला असून याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य असलेले लखनसिंह मोहनलाल कटरे यांची थेट मुलाखत ‘लोकमत’ने घेतली. या मुलाखतीत चर्चा करतांना ते म्हणाले, जगातला कुठलाही विषय घ्या परंतु त्यासाठी मायबोलीवर प्राविण्य असल्याशिवाय तो विषय पाहिजे तसा शिकता येत नाही. मराठी, झाडीबोली, पोवारी बोली अशा कुठल्याही भाषा शिकणे चांगलेच आहे. परंतु मायबोली असलेली मराठी प्राथमिक शिक्षणातूनच मिळायला हवी. पाया मजबूत करण्यासाठी मराठी अत्यंत आवश्यक आहे.
लखनसिंह कटरे यांनी सन २००९ मध्ये ९ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद भूषविले. पुन्हा २००४ मध्ये आनंदवन वरोरा येथे झालेल्या ११ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद भूषविले. महाराष्ट्रातील सर्व बोलींचे एकत्रीकरण करून स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र बोली साहित्य मंडळाचे ते संस्थापक सदस्य आहेत. कटरे १९६९ मध्ये आदर्श विद्यालयात शिकत असताना ते सेमी इंग्रजी माध्यमात शिकत होते. परंतु त्यांचा पाया मराठीचा होता. मराठी मजबूत असल्यामुळे इंग्रजी विषय कठिण वाटला नाही असे त्यांनी सांगितले. कटरे हे शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त झाले. जिल्हा सहकार निबंधक म्हणून काम केले. ३० वर्षाच्या सेवेत हजारो निर्णय दिले. परंतु जे निर्णय त्यांनी दिले ते निर्णय सर्व मराठीतूनच दिले. न्यायव्यवस्थेचे कामकाज इंग्रजीशिवाय चालू शकत नाही हा गैरसमज आपण दूर केल्याचे ते म्हणाले. कटरे यांनी दिलेल्या तीन निर्णयांच्या विरोधात तीन प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलीत. परंतु त्यांनी दिलेले निर्णय सर्वोच्च न्यायालयात देखील कायम ठेवण्यात आले. किमान १२ वी पर्यंत मराठी सक्तीची करावी. ५० टक्क्यांपेक्षा मराठीत कमी गुण मिळाले तर त्याला चक्क नापास समजावे असा निर्णय अंमलात आणावा. एलएलबीसाठी ५० टक्के गुणांची गरज असते तीच अट मराठी विषयासंदर्भात लागू करावी. आजचा विद्यार्थी फक्त गुण घेण्यापूरता माहिती संकलीत करतो. परंतु त्याला ज्ञान मिळत नाही. ज्ञान मिळवायचे असेल तर मूळ संकल्पना मातृभाषेतून मांडली गेली पाहिजे. एक कविता संपूर्ण एका ग्रंथाएवढा अर्थ सांगून जाते. तर कथा-कादंबऱ्यांचा अर्थ एका ओळीपुरता मर्यादीत असतो. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण मनुष्याला सर्व दृष्टीकोणातून सक्षम बनविते. विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण मराठीतच असावे. कॉन्व्हेंट संस्कृती बंद व्हायला हवी. १२ वी पर्यंत मराठी हा विषय सक्तीचा असावा. वर्ग १ ते ४ चे शिक्षण शंभर टक्के मराठीत द्यावे. पाचवीनंतर इंग्रजी द्यावी. परंतु मराठीतून त्या विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढेल याकडे शिक्षकांचा कल असायला हवा.
मराठी शिकविण्याचा मुख्यमंत्र्यांनी धरलेला आग्रह हा मराठीच्या संवर्धनासाठी आहे. मराठीत कविता, कथासंग्रह, संकीर्ण संग्रह लिहीण्याकडे आपला कल आहे का यावर सांगतांना कटरे म्हणाले, वाचनाची सवय आईने लावली. त्या वाचनातून आपल्या विचारांना कागदावर उतरविण्यासाठी महत्त्वाची भूमिका त्यांच्या शिक्षिका मंदाकिनी सगदेव यांनी बजाविली. आई-वडिलांनी मुलांचे प्राथमिक शिक्षण मराठीतूनच व्हावे यासाठी स्वत: पुढाकार घ्यावा. कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे मराठीचा ऱ्हास होत आहे, याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
एक कविता एका ग्रंथाच्या बरोबरीचे ज्ञान समाजासमोर मांडते आणि एका कथासंग्रहाचा अर्थ एका वाक्यात काढला जातो. किती लिहिले आहे याला महत्त्व नाही. तर जे लिहिले आहे त्याच्यात दडलेला अर्थ किती महत्त्वाचा आहे हे महत्त्वाचे आहे. ते भरीव शब्द करण्यासाठी मातृभाषेतूनच पाया मजबूत केल्यास विद्यार्थी ज्ञानवंत होतो.