स्थानांतरणाची प्रतीक्षा : नव्या जागेतील यार्डाची कामे सुरूचगोंदिया : सुमारे ५५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थानांतरणाचा प्रश्न सुटता सुटत नसल्याचे बघावयास मिळत आहे. स्मशानघाट मार्गावरील ऐसपैस जागेत तीन वर्षांपूर्वी नवीन मार्केट यार्डची निर्मिती करण्यात आली, मात्र अद्याप येथील कामे पूर्णपणे झाली नसल्याचे सांगत तिथे बाजार समितीचा कारभार स्थानांतरित करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे बाजार समिती नव्या मार्केट यार्डमध्ये स्थानांतरित करण्याचा मुहूर्त सध्या तरी दिसून येत नाही.शहरात भर वस्तीत असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा वाढत्या व्यापासह आता व्यवहाराच्या दृष्टीने लहान पडत आहे. बाजार समितीचा वाढता व्यापार बघता शहरातील भाजी बाजारालाही विशेष जागा मिळावी या उद्देशातून मोक्षधाम मार्गावर मनोहरभाई पटेल मार्केट यार्ड तयार करण्यात आले आहे. १९ एकर एवढ्या प्रशस्त जागेत या यार्डची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये सहा शेड, १५०० मेट्रीक टन क्षमतेचे दोन गोदाम, प्रशासकीय इमारत, व्यापाऱ्यांसाठी ७७ गाळे तयार झाले आहेत. सन २०१३-१४ मध्ये हे सर्व काम झाले असूनही व्यापारी नागरिकांच्या दृष्टीने आणखीही कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.एकंदर मार्केट यार्ड आजघडीला तरी पूर्णपणे तयार नसल्याने जुनी कृषी उत्पन्न बाजार समिती या नव्या मार्केट यार्डमध्ये स्थानांतरीत झालेली नाही. याशिवाय व्यापाऱ्यांच्याही काही मागण्या असल्याची माहिती आहे. मात्र या सर्व कारणांमुळे बाजार समितीला स्थानांतरणाची प्रतिक्षा लागली आहे. (शहर प्रतिनिधी)तीन शेडसह अन्य कामे प्रस्तावित नवीन मार्केट यार्डमध्ये बाजार समितीकडून आणखी तीन शेड तयार करण्याचे नियोजन सुरू आहे. यासह यार्डचे विद्युतीकरण तसेच बाजार समिती स्थानांतरीत झाल्यावर वाढणारा लोकांचा वावर बघता सुलभ शौचालयाचे बांधकाम करण्याचे नियोजन बाजार समितीकडून केले जात आहे. हे तीन शेड तयार झाल्यावर बाजार एकूण नऊ शेड होणार आहेत. यातील सहा शेड धानासाठी, दोन शेड भाजी बाजारसाठी तर एक शेड बाजार समिती स्वत:कडे ठेवणार आहे. यात भविष्यात फळ बाजार आल्यास त्यांना हे शेड देता येणार असे सध्याचे नियोजन दिसून येत आहे.
बाजार समितीच्या यार्डाचे भिजत घोंगडे
By admin | Published: January 15, 2016 2:37 AM