६ हजार ३१३ महिलांचे मातृवंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 06:00 AM2019-10-25T06:00:00+5:302019-10-25T06:00:14+5:30
ग्रामीण भागातील गर्भवती महिलांची गर्भावस्थेत योग्य काळजी घेतली जावी व त्यांना सकस आहार मिळावा यासाठी त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने तीन टप्यात पाच हजार रूपये केंद्र शासनाने देण्याचे ठरविले आहे. केंद्र सरकार मार्फत गरोदर महिला-स्तनदा मातेस पाच हजार रूपये पंतप्रधान मातृ वंदन योजनेतून दिले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बाल आणि माता मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. जननी शिशू सुरक्षा योजनेपासून माहेर घर, हिरकणी कक्षापर्यंतच्या सोयी गर्भवतींसाठी केल्या जात आहे. मात्र यानंतरही मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे गर्भवतींना पहिल्या अपत्यासाठी शासन मातृ वंदन योजनेतंर्गत पाच हजार रूपयांचे अनुदान देत आहे.
ग्रामीण भागातील गर्भवती महिलांची गर्भावस्थेत योग्य काळजी घेतली जावी व त्यांना सकस आहार मिळावा यासाठी त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने तीन टप्यात पाच हजार रूपये केंद्र शासनाने देण्याचे ठरविले आहे. केंद्र सरकार मार्फत गरोदर महिला-स्तनदा मातेस पाच हजार रूपये पंतप्रधान मातृ वंदन योजनेतून दिले जात आहे. विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीे हा अनुसूचित जाती, जमाती व द्रारिद्रय रेषेखालील असावा अशी कोणतीही अट नाही. पहिल्या अपत्यासाठी नोकरदार महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. मात्र अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा सेविका यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या व्यतिरीक्त जननी सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी पूर्वीप्रमाणेच अनुदान देण्यात येणार आहे.
लाभार्थ्यांच्या बँक, पोस्ट खात्यावर (डीबीटी) ही रक्कम जमा होणार आहे. यासाठी लाभार्थीचे खाते क्रमांक व आधार क्रमांक आवश्यक आहे.
६३१३ महिला पात्र
सन २०१९ या वर्षात गर्भवती झालेल्या महिलांपैकी जी महिला पहिल्यांदाच गर्भवती झाली त्या महिलांना या योजनेचा लाभ दिला गेला आहे. गोंदिया जिल्ह्यात १२ हजार १६ महिला गर्भवती असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. यातील सहा हजार ३१३ महिला पहिल्यांदाच गर्भवती असल्याचे पुढे आले आहे. या महिलांना या योजनेचा लाभ दिला गेला आहे.
असा मिळणार लाभ
गर्भवतीच्या नोंदणीवेळी एक हजार रूपये देण्यात येते. यासाठी गर्भवती होण्याच्या १५० दिवसांत नोंदणी करणे आवश्यक आहे. गरोदरपणाला सहा महिने पूर्ण होताच दोन हजार रूपये देण्यात येतील. त्यासाठी किमान एक तपासणी करणे आवश्यक आहे. प्रसूतीपश्चात बालकाची जन्मनोंद व पेंटाव्हॅलन्ट ३ रा डोज दिल्यानंतर (१४ आठवडे) लसीकरण पूर्ण झाल्यावर तिसऱ्या टप्यातील दोन हजार रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे.