गोंदिया : साधारणत: पावसाळ्यात विजेचा कडकडात होत असतो. पावसाळ्यात कोसळणाऱ्या विजेपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी घरामध्ये प्लग जोडलेले विद्युत उपकरणे हाताळू नये. विद्युत उपकरणे बंद ठेवावे. मजबूत असलेले पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाणी असल्याने शक्यतो घरातच राहावे. अशावेळी दूरध्वनीचा वापर करु नये. पाण्याचे नळ, टेलिफोन, फ्रिज इत्यादींना स्पर्श करु नये. वीजवाहक वस्तू जसे- लोखंडी पाईप, स्टोह तसेच विजेवर चालणाऱ्या यंत्रापासून दूर राहावे. शक्य असल्यास आपआपल्या घरी वीजरोधक यंत्रणा बसवावी. पावसाळ्यात घराबाहेर असाल तर झाडाखाली, विजेच्या खांबाजवळ उभे राहू नये. झाडाच्या उंचीपेक्षा, झाडापासून दुप्पट अंतरावर उभे राहावे. उंच जागेवर किंवा झाडावर चढू नये. धातूची दांडी असलेल्या छत्रीचा उपयोग करु नये. शेतात काम करीत असल्यास सुरिक्षत ठिकाणाचा आसरा घ्यावा. शक्यतो पायाखाली लाकूड, प्लास्टीक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवावे. धातूपासून बनलेल्या वस्तू जसे- कृषी पंप इत्यादीपासून दूर राहावे. टेलिफोन खांब, विजेचे खांब, टेलिफोन व टेलिव्हिजन टॉवर यांचेपासून दूर राहावे. असे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.(तालुका प्रतिनिधी)
पावसाळ्यात कोसळणाऱ्या विजेपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी उपाययोजना
By admin | Published: June 13, 2016 12:22 AM