रखरखत्या उन्हापुढे मिस्ट कुलिंगही फेल
By admin | Published: June 14, 2016 01:20 AM2016-06-14T01:20:59+5:302016-06-14T01:20:59+5:30
प्रवाशांना उन्हाळ््यात गारवा मिळावा यासाठी रेल्वे स्थानकावर ‘मिस्ट कुलिंग’ची व्यवस्था करण्यात आली आहे.
गोंदिया : प्रवाशांना उन्हाळ््यात गारवा मिळावा यासाठी रेल्वे स्थानकावर ‘मिस्ट कुलिंग’ची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र तापमानापुढे ही व्यवस्थाही फेल ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक आताही चांगलेच तापलेलेच असून प्रवाशांना घामाजलेल्या अंगानेच गाड्यांची वाट बघत बसावे लागत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अंगाची लाही-लाही होते. या समस्येचे निवारण करण्यासाठी ५० लाख रूपयांच्या कुलिंग सिस्टमला मंजुरी देऊन मागील वर्षी ही प्रणाली गोंदिया स्थानकावर सुरू करण्यात आली होती. आता पुन्हा यावर्षी एप्रिल महिन्यापासून ही प्रणाली सुरू करण्यात आली. मात्र एप्रिल व मे संपले असताना व जून महिना सुरू असतानाही ही कुलिंग सिस्टम ‘कधी बंद तर कधी सुरू’ ठेवण्यात येत असल्याने प्रवाशांच्या अंगाची लाही लाही होत आहे.
प्रवाशांना सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने रेल्वे स्थानक प्रशासनाने कुलिंग सिस्टमला सुरूवात केली. उन्हाळ्यात ४८ अंशापर्यंत पोहोचणारे तापमान २५ ते ३० अंशापर्यंत कुलिंग सिस्टमुळे आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे रेल्वे स्थानकातील प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांनाही गारवा मिळणार होता. मात्र सदर सिस्टम संचालित करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे प्रवाशांना त्याचा लाभ योग्यरीत्या मिळत नसल्याचे दिसून येते.
गोंदियाचे रेल्वे स्थानक ‘अ’ श्रेणीत असून वर्षाकाठी सहा कोटींचा महसूल या स्थानकातून प्राप्त होतो. मध्यवर्ती व महत्त्वाचे स्थानक असल्याचा बहुमानही या स्थानकाला आहे. येथून मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि चंद्रपूरच्या दिशेने धावणाऱ्या गाड्यांतून हजारो प्रवासी प्रवास करतात.
त्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या कुलिंग सिस्टम अंतर्गत प्रत्येक फलाटावर असलेल्या पंख्यांना थंड पाण्याचे पाईप जोडण्यात आले आहेत. पंखे सुरू झाल्यानंतर फलाटावर गाडी येण्याच्या अर्धा तास पूर्वीपासून पाणी सोडण्यात येणार होते. मात्र आता अर्धा तास तर सोडाच, गाडी येण्याच्या दोन मिनिटांपूर्वीसुद्धा कुलिंग सिस्टिम सुरू करण्यात येत नाही. एखाद्या वेळी सुरू करण्यात आलेच तर प्रवाशांचे धन्यभाग. अन्यथा सुविधा असूनही उष्णतेची झळ प्रवाशांना सहन करावीच लागते. संपूर्ण देशात अशाप्रकारचे प्रयोग बिलासपूर व रायपूर येथील स्थानकांवर करण्यात आले होते. गोंदियातील प्रयोग देशातील तिसरे आणि राज्यातील पहिलेच आहे.