कारवाईच्या भीतीने भरले 'त्या' केंद्रांनी पैसे; आज होणार अंतिम पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2022 01:48 PM2022-11-02T13:48:29+5:302022-11-02T13:49:48+5:30
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची यंत्रणा लागली कामाला
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत रब्बी हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाचा सात धान खरेदी केंद्रांनी घोळ केला होता. ही बाब उघडकीस आल्यानंतर या केंद्रांना ३१ ऑक्टोबरपर्यंत धान अथवा पैसे भरण्याची नोटीस फेडरेशनने बजावली होती. यानंतर या धान खरेदी केंद्रांनी तफावत असलेल्या धानाचे पैसे भरल्याची माहिती आहे. त्यामुळे तूर्तास या केंद्रांवरील फौजदारी कारवाई टळली आहे. मात्र, सर्व धान खरेदी केंद्रांच्या अंतिम पडताळणीची प्रक्रिया बुधवारी (दि. २) पार पडणार आहे.
यंदा रब्बी हंगामातील धान खरेदी दरम्यान बराच घोळ पुढे आला होता. तर खरेदी केंद्रांवर खरेदी करण्यात आलेला जवळपास ४० हजार क्विंटल धान गायब असल्याची बाब राईस मिलर्सच्या तक्रारीनंतर पुढे आली. यात सालेकसा तालुक्यातील तीन, गोंदिया तालुक्यातील दोन, गोरेगाव आणि आमगाव तालुक्यातील प्रत्येकी एका धान खरेदी केंद्राचा समावेश होता. तर सालेकसा येथील एका धान खरेदी केंद्रावर मार्केटिंग फेडरेशनने गुन्हा दाखल केला आहे.
तर उर्वरित सात धान खरेदी केंद्रांना नोटीस बजावून ३१ ऑक्टोबरपर्यंत धान अथवा तफावत असलेल्या धानाची रक्कम भरण्यास सांगितले होते. अन्यथा फौजदारी कारवाईला तयार राहा, अशी सूचना केली होती. त्यानंतर सात धान खरेदी केंद्रांच्या संचालक मंडळामध्ये खळबळ उडाली. त्यांनी नोटीस मिळाली तेव्हापासूनच धानाची आणि पैशाची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. अखेर सोमवारी या केंद्रांनी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे तफावत असलेल्या धानाची रक्कम भरल्याची माहिती आहे. त्यामुळे तूर्तास तरी या केंद्रांवरील फौजदारी कारवाईचे संकट दूर झाले आहे.
पूर्णच धान खरेदी केंद्रांची हाेणार पडताळणी
रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या १०७ धान खरेदी केंद्रांवरून धान खरेदी करण्यात आली होती. यात सात खरेदी केंद्रांनी घोळ केल्याची बाब पुढे आली. त्यामुळे आता सर्वच १०७ धान खरेदी केंद्रांकडे काही धान शिल्लक असल्यास त्यांच्या गोदामात तेवढा धान शिल्लक आहे अथवा नाही याची पडताळणी केली जाणार आहे. याची सुरुवात बुधवारपासून केली जाणार असल्याची माहिती आहे.
कुणी ठेवली शेती गहाण, कुणी आणले व्याजाने पैसे
रब्बी हंगामातील धान खरेदी केलेल्या धानाची सात धान खरेदी केंद्रांनी परस्पर विक्री केली होती. या धान खरेदी केंद्रांना नोटीस बजावून धान अथवा फरक असलेल्या धानाची रक्कम भरण्यास सांगितले होते. दरम्यान, फौजदारी कारवाई नको म्हणून धान खरेदी केंद्रांच्या संचालक मंडळाने पैसे भरण्यासाठी जमीन गहाण ठेवली, तर कुणी व्याजाने पैसे आणून ते फेडरेशनकडे भरल्याची माहिती आहे.
खरेदी करण्यात आलेल्या धानात तफावत असलेल्या धानाचे पैसे भरण्यासाठी संबंधित धान खरेदी केंद्रांना नोटीस बजावली होती. यानंतर या धान खरेदी केंद्रांनी पैसे भरले आहेत. तर काही धान खरेदी केंद्रांच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम कारवाई केली जाईल.
- मनोज बाजपेयी, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी