पंचायत समितीची मासिक सभा तहकूब
By admin | Published: January 18, 2016 02:10 AM2016-01-18T02:10:50+5:302016-01-18T02:10:50+5:30
येथील पंचायत समितीच्या मासिक सभेचे आयोजन पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले.
अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित : बीडीओंचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही
तिरोडा : येथील पंचायत समितीच्या मासिक सभेचे आयोजन पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले. शनिवारी (दि.१६) ठरल्याप्रमाणे दुपारी १२ वाजता सर्व पंचायत समिती सदस्य, उपसभापती किशोरकुमार पारधी, सभापती उषा किंदरले तसेच खंड विकास अधिकारी एच.एस. मानकर उपस्थित झाले. परंतु १० विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित झाले नसल्याचे कळताच पं.स. सदस्य डॉ.बी.एस. रहांगडाले, नत्थू अंबुले, मनोहर राऊत यांनी आवाज उठविला व सभा तहकूब करण्यात आली.
तालुक्याच्या कार्यभार व्यवस्थित चालावा व समस्या मार्गी निघाव्यात यासाठी पंचायत समितीची निर्मिती झाली. त्यावर क्षेत्रानुसार पंचायत समिती सदस्य जनतेच्या माध्यमातून निवडून दिले जातात. त्यांच्या माध्यमातून बरीच विकास कामे व नागरिकांची कामे केली जातात. परंतु तिरोडा पंचायत समितीमध्ये संबंधित विभागाचे विभागप्रमुख हाजर नसल्याने त्यासंबंधी समस्या असल्यास निकाली काढल्या जावू शकत नाही.
पंचायत समितीच्या सभागृहात सभेला सुरुवात होताच कोणकोणत्या विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित नाहीत, याची माहिती घेतली असता १० विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे ही आजची सभा तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.
पंचायत समितीच्या आजपर्यंत सहा सभा घेण्यात आल्या. या सभेला तहसीलदार किंवा त्यांचे अधिनस्त कर्मचारी कधीही उपस्थित झाले नाही. तसेच बांधकाम विभागाचे शाखा अभियंता निमकर, जि.प. लघू पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी बघमार, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, वन विभाग तिरोड्याचे अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी हे सभेला कधीही उपस्थित राहत नसल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे.
पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एच.एस. मानकर यांचा पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे वचक नसल्यामुळे कर्मचारी ऐकत नाही. आपल्या टेबलावर राहत नसल्याने तालुक्यातील सरपंच, उपसरपंच तसेच नागरिक पंचायत समितीला येतात, त्यांना त्यांचे कोणतेही काम न होताच परत जावे लागते. वेळेवर कोणतेही काम होत नाही.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तिरोडा पंचायत समितीला भेट दिली असता गटविकास अधिकारी व सहायक गटविकास अधिकारी कोणतीही माहिती न देता गैरहजर होते. गटविकास अधिकारी यांना चेंबरमध्ये बोलावले तर येत नाही. माझी बदली करुन द्याल, अशी भाषा वापरत असल्याचा आरोप उपसभापती किशोरकुमार पारधी यांनी केलेला आहे.
खंड विकास अधिकारी यांच्या अशा वागण्यामुळे सभापती, उपसभापती, सदस्यांना नागरिकांच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. आपल्या क्षेत्राचा विकास, परिसरातील शौचालयाचे मुद्दे, घरकुलांचे विषय, एमआरईजीएस याबाबत अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत. परिसरातील नागरिकांच्या समस्या सुटत नसतील तर पदाधिकारी कोणत्या कामाचे? असाही सूर नागरिकांत दिसून येत आहे. तहसील कार्यालयातील अधिकारी व प्रतिनिधी सभेला उपस्थित राहावे, जेणेकरून जनतेच्या समस्या निकाली काढण्यात येतील, याकडे जिल्हाधिकारी यांनी तर पं.स. चे अधिनस्त कर्मचारी, अभियंता, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता निमकर यांनी उपस्थित राहण्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांनी जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. सदर पंचायत समितीची अवस्था व नोकरशाही यांचा वरचढपणा, अरेरावीपणा दूर व्हावा, असा आरोप पं.स. उपसभापती किशोरकुमार पारधी यांनी केलेला आहे.
सदर गंभीर बाबीकडे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून जनतेचा समस्या सोडवाव्यात.
अन्यथा जनआक्रोशाला एकाध-दुसरा कर्मचारी व अधिकारी बळी पडल्याशिवार राहणार नाही, अशी वस्तुस्थिती असल्याचे कळविण्यात आले.
(शहर प्रतिनिधी)