गोंदिया जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक महिला सदस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 12:29 PM2021-01-20T12:29:50+5:302021-01-20T12:42:49+5:30
Gondia News गोंदिया ग्रामपंचायतींमध्ये ६० टक्के महिलाच कारभारी राहणार असल्याचे चित्र ग्रामपंचायतींच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामपंचायतच्या एकूण जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असल्या तरी प्रत्यक्षात यापेक्षा अधिक महिला उमेदवार निवडून आल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ६० टक्के महिलाच कारभारी राहणार असल्याचे चित्र ग्रामपंचायतींच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या होत्या. यापैकी ८ ग्रामपंचायती व ३११ सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामुळे प्रत्यक्षात १६९३ जागांपैकी प्रत्यक्षात १३८२ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत एकूण ३१५१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात १३७० महिला तर उर्वरित पुरुष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सोमवारी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर यात ९३० महिला उमेदवार निवडून आल्या आहे. पुरुष उमेदवारांच्या तुलनेत निवडून आलेल्यांमध्ये महिला सदस्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये ६० टक्के महिला कारभारी राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले. विशेष म्हणजे सरपंच पदाचे आरक्षण अद्याप जाहीर झाले नसून, यानंतरसुद्धा बऱ्याच ग्रामपंचायतींच्या कारभारी महिलाच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
गोंदिया तालुक्यात सर्वाधिक महिला सदस्य
ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक ४४० महिला उमेदवार या गोंदिया तालुक्यातूनच रिंगणात होत्या. यापैकी १६७ वर महिला उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे या तालुक्यात महिला सदस्यांची संख्या अधिक आहे. तर सालेकसा ग्रामपंचायतमध्ये एकूण ८१ सदस्यांमध्ये ५० महिला सदस्य तर ३१ पुरुष सदस्य निवडून आले आहे. त्यामुळे या तालुक्यातसुद्धा गावकारभाराची सूत्रे महिलांच्याच हाती राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महिला सदस्यांच्या प्रतिक्रिया
गावकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने गावाचा विकास करण्याची संधी मला दिली आहे. मिळालेल्या संधीचे सोने करून गाव विकासासाठी असलेल्या शासनाच्या योजना गावात राबवून गावाचा सर्वांगिण विकास कसा करता येईल, यासाठीच प्रयत्न असणार आहे.
-लिना रहांगडाले, सदस्य.
१४ व्या आणि १५ व्या वित्त आयोगामुळे ग्रामपंचायतींना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या माध्यमातून गाव विकासासाठी बऱ्याच प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे गावकऱ्यांनी मला दिलेल्या संधीचा योग्य उपयोग करून गावच्या विकासाला हातभार लावणार.
- वच्छला बावणे, सदस्य.
गावकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने आपल्याला गावाचा विकास करण्याची संधी दिली आहे. त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जावू देणार नाही. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गाव विकासाला गती देणे, पायाभूत सुविधा, आरोग्यविषयक उपक्रम राबविणे आणि अतिक्रमणाची समस्या दूर करण्याचे काम मी करणार आहे.
-भारती गावंडे, सदस्य.
ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी महिला उमेदवार : ९३०
...................