सालेकसा : मध्य प्रदेशातील लांजी येथून दारूचा साठा घेऊन छत्तीसगडकडे जाणाऱ्या दोन मोटारसायकलसह तिघांना सालेकसा पोलिसांनी गुरुवारी (दि. ६) रात्रीच्या सुमारास अटक केली. या तिन्ही आराेपींकडून दोन मोटारसायकलसह २२ हजार १०० रुपयांची दारू जप्त केली आहे. नरेश घनश्याम सोनी (वय ३४), सचिनकुमार घनश्याम सोनी (२८), पिंटू बालमुकुंद सोनी (३५, सर्व रा. रामनगर मुक्तीधाम लोधीपारा भिलाई, छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, सालेकसा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोदकुमार बघेले हे गुरुवारी रात्री महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेवर गस्तीवर असताना दोन मोटारसायकलींवरून तीन युवक बॅग घेऊन छत्तीसगडकडे जात असताना सालेकसा पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची चौकशी केली. तसेच त्यांच्याजवळ असलेल्या बॅगेची तपासणी केली असता त्यात गोवा कंपनीच्या व्हिस्कीच्या १८० एमएलच्या १७० बाॅटल आढळल्या. या जप्त केलेल्या दारूची किंमत २२ हजार १०० रुपये आहे. ही दारू मध्य प्रदेशातील लांजी येथून खरेदी करून छत्तीसगडमध्ये विक्रीसाठी नेत असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोन मोटारसायकलसह तीन युवकांना अटक केली. त्यांच्यावर दारूबंदी कायद्यान्वये सालेकसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले, पोलीस हवालदार बिजेंद्र बिसेन करीत आहेत.