‘माझ्या पत्नीशी मोबाईलवर संवाद साधत असल्याने केला खून’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:18 AM2021-07-05T04:18:55+5:302021-07-05T04:18:55+5:30
गोंदिया : उत्तर प्रदेशच्या नेवादा येथील निरंजन भारती व अमन कुमार भारती यांचा, डोक्यावर काठीने मारून त्यांचा सहकारी मजूर ...
गोंदिया : उत्तर प्रदेशच्या नेवादा येथील निरंजन भारती व अमन कुमार भारती यांचा, डोक्यावर काठीने मारून त्यांचा सहकारी मजूर बलवान सौरभ जयस्वाल ऊर्फ रॉय (४०, रा. रतनपुरा अर्जुन वॉल्टर गंज जिल्हा बस्ती, उत्तर प्रदेश) याने २४ जूनच्या रात्री खून केला. मृत दोघेही आपल्या पत्नीसोबत नेहमी बोलत होते. आपल्या पत्नीसोबत बोलून आपल्याला नेहमी चिडवत असत. माझ्यासमोरही पत्नीशी बोलत असल्यामुळे या कृत्यातून आपला राग अनावर झाला. परिणामी लाकडी दांड्याने त्या दोघांना मारून यमसदनी धाडले, अशी कबुली आरोपी बलवान याने पोलिसांना दिली.
गोंदिया शहर पोलिसांनी १ जुलै रोजी आरोपी बलवानला गुजरातच्या सुरत येथून अटक केली. त्याला गोंदियाच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गोंदियाच्या सिंधी कॉलनी रावण मैदान येथे रा. नंदलाल गोपलानी यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्या घराचे दगड घासण्याचे काम करण्यासाठी उत्तर प्रदेशातील चार मजूर आले होते. ज्या ठिकाणी काम सुरू होते, त्याच ठिकाणी ते राहत होते. मृत निरंजन भारती, अमन कुमार भारती, आरोपी बलवान व खेमन कपिल देव यादव हे चौघेही एकत्र स्वयंपाक करून राहत असत. २४ जूनच्या रात्री नऊ वाजता चौघांनी एकत्र जेवण केले व नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत आराम करायला गेले. बलवानच्या पत्नीसोबत दोन्ही मृत मोबाईलवर संपर्क साधत होते. बलवानच्या पत्नीजवळ दुसरा मोबाईल क्रमांक होता. आपल्या बायकोसोबत ते दोघेही अनेकदा बोलत होते. या संशयावरून त्यांना विचारणा केली असता, मृतकांनी कबुली दिली होती. तरीही त्यांचे बोलणे सुरूच होते. इतकेच नव्हे, तर ते आपल्यासमोर आपल्या पत्नीला फोन करून तिच्याशी बोलत असत व आपली थट्टा करीत असत. यातून त्यांचा व माझा नेहमीच वाद व्हायचा. घटनेच्या दिवशीही मृतकांनी तेच कृत्य केले. परिणामी आपल्याला राग आल्याने त्यांचा खून केल्याची कबुली बलवानने पोलिसांना दिल्याचे गोंदिया शहरचे ठाणेदार महेश बनसोडे यांनी सांगितले.