गोंदिया : शहरातील श्रीनगर चंद्रशेखर वॉर्डातील महिलेवर धारदार शस्त्र व वरवंट्याने हल्ला करून तिचा खून केला, तर तिच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना ७ जूनच्या पहाटे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संध्या महेंद्र कोरे (वय ४८, रा. चंद्रशेखर वाॅर्ड, गोंदिया) असे मृत महिलेचे नाव आहे; तर करण महेंद्र कोरे (२४) असे जखमी मुलाचे नाव आहे.
शहरातील श्रीनगरच्या चंद्रशेखर वॉर्डातील सदाराम तुकाराम उके यांच्या घरी भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या संध्या महेंद्र कोरे (४८) यांचा खून करण्यात आला. संध्या कोरे हिला रायपूर येथे दिले होते. तिचे पती २० वर्षांपूर्वी मृत्यू पावल्याने ती माहेरी येऊन गोंदियात भाड्याने राहू लागली. संध्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलीचे लग्न झाल्याने ती सासरी गेली. माय-लेक श्रीनगरच्या चंद्रशेखर वॉर्डात राहात होते. करण कोरे हा नागपूरला एमआरशिप करीत होता. तो अधून मधून गोंदियाला यायचा. परंतु जानेवारी २०२३ पासून तो गोंदियात आईसोबत राहात होता. ७ जूनच्या पहाटे ३:५८ वाजता एका अनोळखी व्यक्तीने धारदार शस्त्राने व वरवंट्याने मारून खून केला, तर करणला गंभीर जखमी केले. जखमी करणने कसाबसा मामाला फोन केल्यावर मामा प्रकाश कवडू पाथोडे (४३) हे आपली पत्नी चित्रांगणा पाथोडे व व बहीण उर्मिला चुटे यांना घेऊन मोटारसायकलने चंद्रशेखर वॉर्ड येथील संध्या कोरे यांच्या खोलीवर गेले. त्यात संध्या मृतावस्थेत आढळली, तर करणच्या अंगावरही जखमा होत्या. तो देखील पडून होता. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक शरद शैदाने करीत आहेत.
तपासासाठी पथके नेमलीचंद्रशेखर वॉर्डातील संध्या कोरे यांच्या खुनाच्या प्रकरणात तपास करण्यासाठी गोंदिया शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा चमू तयार करण्यात आला. त्या चमूला तपासासाठी वेळीच रवाना करण्यात आले. सोबतच स्थानिक गुन्हे शाखेचा एक चमू आरोपीचा शोध घेण्यासाठी कामाला लागला आहे.
स्वयंपाक खोलीत फरशीवर पडली होती संध्याया प्रकरणातील तक्रारकर्ते प्रकाश पाथोडे हे आपल्या पत्नी व बहिणीला घेऊन चंद्रशेखर वॉर्डात गेले तेव्हा मृतक संध्या कोरे ही तिच्या घरी स्वयंपाक खोलीत फरशीवर पडलेली होती. तिच्या शरीरातून रक्त निघत होते. तिला पाहिल्यावर तिच्या डोक्याला व गळ्याला गंभीर जखमा होत्या. त्या खोलीत रक्ताचे थारोळे पडले होते. बेडरूममध्ये पलंगावर दगडाचा वरवंटा पडलेला होता. संध्या कोरे ही मृतावस्थेत होती, तर मुलगा करण कोरे हा संध्याच्या शेजारी पडलेला होता. त्याच्या डाव्या हाताला व कपाळावर जखमा होत्या.
१०० वर डायल करून मागितली मदतजखमी करण कोरे याला या घटनेबाबत विचारले असता, त्याने प्रकाश पाथोडे यांना काहीही सांगितले नाही. त्यामुळे प्रकाश यांनी पोलिसांना १०० नंबरवर कॉल करून माहिती दिली. पोलिस त्या ठिकाणी पोहोचले. करणला उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.