नागराधामचा होणार लवकरच कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:55 PM2018-03-16T23:55:55+5:302018-03-16T23:55:55+5:30
प्राचीन शिव मंदिर असलेल्या जवळील ग्राम नागराधामच्या विकासासाठी तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत शासनाने दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून मंदिर परिसरात विविध विकास कामे होणार असून यातून नागराधामचा लवकरच कायापालट होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्राचीन शिव मंदिर असलेल्या जवळील ग्राम नागराधामच्या विकासासाठी तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत शासनाने दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून मंदिर परिसरात विविध विकास कामे होणार असून यातून नागराधामचा लवकरच कायापालट होणार आहे.
नागराधाम येथील शिव मंदिराचा ८०० वर्षे जुना इतिहास असून भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या खोदकामात मानव निर्मित प्राचीन अवशेष मिळाले आहेत. यामुळे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सतत प्रयत्न करून नागराधामला ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला. तर सोबतच नागराधामच्या विकासासाठी दोन कोटींचा निधी मंजूर करविला होता. आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेला दोन कोटींचा निधी आता वितरीत करण्यात आला असून या निधीतून मंदिर परिसरात भक्त निवास, सुरक्षा भिंत, शौचालय, सिमेंट व डांबरी रस्ते, पथदिवे व पेयजल पुर्तीची व्यवस्था केली जाणार आहे.
या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार अग्रवाल यांनी शासनाचे वास्तुविद तसेच बांधकामाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांच्यासह अन्य अधिकारी व गावातील पदाधिकाऱ्यांसह पाहणी केली. या पाहणीत आमदार अग्रवाल यांनी दोन कोटींच्या निधीतून करण्यात येणाºया कामांचा प्रस्ताव तयार करून शासनाला मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी रमएश लिल्हारे, चमन बिसेन, माधुरी हरिणखेडे, ओमप्रकाश भक्तवर्ती, पुष्पा अटराहे, अमृतलाल पतेह, दुर्गाप्रसाद धांदे, प्रकाश रहमतकर, सुरेंद्र गणवीर, मिना लिल्हारे, बिंदू गिरी, पुष्पा ढेकवार, निर्मला कुंडभरे, नंदा मस्के, प्रितलाल पतेह, हितेश चिखलोंडे, घनश्याम लिल्हारे, विवेकानंद पंचबुद्धे, योगेश्वरी पगरवार, टेकलाल चिखलोंडे, चंदनलाल चिखलोंडे, मदन दमाहे, लिखीराम पगरवार, प्रभुलाल शेंडे, कृष्णा बांते, तुकाराम धांडे यांच्यासह गावकरी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बायपाससाठी प्रयत्न सुरु
आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने नागराधामला ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असून यातच त्यांच्या प्रयत्नाने गावातील तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम केले जाणार आहे. शिवाय सध्या नागरा शिव मंदिरात जाण्यासाठी गावातून रस्ता असून अरूंद रस्ता नागरिकांना त्रास होतो. याकडे लक्ष देत गोंदिया-बालाघाट मार्गाने थेट शिव मंदिरसाठी बायपास रस्ता तयार करण्यासाठी आमदार अग्रवाल यांचे प्रयत्न सुरू आहेत. हा बायपास रस्ता तयार झाल्यास शिवरात्री उत्सवात होत असलेल्या ट्राफिक जामच्या समस्येपासून भाविकांना सुटका मिळणार आहे.