नावांचा सस्पेन्स कायम : मतदारही संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 09:54 PM2019-03-22T21:54:58+5:302019-03-22T21:55:18+5:30

भंडारा-गोंदिया मतदार संघाची निवडणूक येत्या ११ एप्रिलला होवू घातली आहे.२५ मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाने त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची अद्यापही घोषणा केलेली नाही.

Names suspicious: voter confusion | नावांचा सस्पेन्स कायम : मतदारही संभ्रमात

नावांचा सस्पेन्स कायम : मतदारही संभ्रमात

googlenewsNext
ठळक मुद्देउमेदवारांशिवाय पक्षांनी केली प्रचाराला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा-गोंदिया मतदार संघाची निवडणूक येत्या ११ एप्रिलला होवू घातली आहे.२५ मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाने त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची अद्यापही घोषणा केलेली नाही. उमेदवारीे अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारासाठी फार कमी कालावधी मिळणार असल्याने या दोन्ही पक्षांनी उमेदवाराशिवाय प्रचाराला मागील पाच सहा दिवसांपासून सुरूवात केली आहे.
या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी-रिपाईची आघाडी असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला ही जागा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राहिल हे स्पष्ट आहे. तसेच भारतीय जनता पक्षाकडे ही जागा असल्याने भाजपचाही उमेदवार रिंगणात राहणार हे स्पष्ट आहे. आपपल्या पक्षाच्या चिन्हाचा प्रचाराला गावपातळीपासून सुरवात झाली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातच नव्हे तर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या आमगाव विधानसभा मतदारसंघातही पक्ष कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात गेल्या तीच चार दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तळ ठोकून बसले आहेत.त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सभा व बैठका घेऊन उमेदवार कोन हा प्रश्न नाही तर पक्षाचा निवडणूक चिन्ह महत्त्वाचे सांगत प्रचाराला लागण्याच्या सूचना केल्याची माहिती आहे. त्यानुसार बुथनिहाय नव्हे तर जिल्हा परिषद गटानुसार बैठकांना सुरवात झाली आहे.
भारतीय जनता पक्षाच्यावतीनेही गेल्या चार-पाच दिवसांपासून मतदारसंघात सातत्याने बैठका घेतल्या जात आहे. पक्षसंघटनेसह सामाजिक संघटना,जातीय समीकरण व नोकरदार वर्गातील संघटनाच्या प्रमुखांशी त्यांनी भेटीगाठीला सुरवात केली आहे. आमदारांनी सुध्दा जिल्हा परिषद गटनिहाय पक्षाच्या प्रचाराला सुरवात केली आहे.
निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहे. मात्र अद्यापही या दोन्ही पक्षांनी त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. उमेदवारांच्या नावांचा सस्पेन्स कायम असल्याने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्ये सुध्दा काही प्रमाणात संभ्रमात आहेत. तर भंडारा-गोंदिया मतदार संघातील मतदार सुध्दा संभ्रमात असल्याचे चित्र आहे. या दोन्ही प्रमुख पक्षांकडून उमेदवार निश्चितला घेवून प्रक्रिया अंतीम टप्प्यात असून उमेवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतीम क्षणी उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
पोस्टर, बॅनर रेडी केवळ छायाचित्राची प्रतीक्षा
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार साहित्यांची जुळवाजुळव करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचा उमेदवार अद्यापही निश्चित झाला नसल्याने त्यांनी प्रिंटीग प्रेसवाल्यांना पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले प्रचार साहित्य तयार करण्यास सांगितले आहे. तर उमेदवाराच्या नावाची घोषणा होताच त्वरीत छायाचित्र उपलब्ध करुन देण्यात येईल, त्यानंतर त्वरीत पोस्टर बॅनर तयार करुन द्या अशा सूचना सुध्दा देऊन ठेवल्या असल्याची माहिती आहे.

Web Title: Names suspicious: voter confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.