१८ वर्षाखालील युवकाची नावे मतदार यादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:25 AM2021-02-20T05:25:41+5:302021-02-20T05:25:41+5:30
सडक अर्जुनी येथे दोन महिन्यांनी नगर पंचायतची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत आपल्या विजयाचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी ...
सडक अर्जुनी येथे दोन महिन्यांनी नगर पंचायतची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत आपल्या विजयाचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी काही जण बोगस मतदारांची नावे मतदार यादीत नोंदवित असल्याची बाब पुढे आली आहे. विशेष काही दिवसांपूर्वीच सडक अर्जुनी येथील मतदार तादीत तालुक्यातील आठ ते दहा गावातील १५० वर मतदारांची नावे नोंदविण्यात आली होती. दरम्यान, हा प्रकार येथील काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. ही बाब ताजी असतानाच आता पुन्हा ऑनलाइन तयार केल्या जात असलेल्या मतदार यादीत १८ वर्षांखालील मतदारांची नावे नोंदविण्यात आल्याची बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे मतदार यादीत ऑनलाइन अथवा ऑफलाइन नोंदणी करताना त्याला पुरावे जोडणे आवश्यक आहे. या पुराव्यांची पडताळणी करूनच त्यांची मतदार यादीत नोंदणी करणे आवश्यक आहे; मात्र येथील मतदार यादीत दोन मतदार हे १८ वर्षांखालील असतानासुद्धा येथील यंत्रणेने त्यांची नावे मतदार यादीत नोंद केली आहे. हा प्रकार येथील माजी सभापती दिनेश अग्रवाल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची लेखी तक्रार पुराव्यास निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे केली. यानंतर तहसील कार्यालयातसुद्धा खळबळ उडाली असून, त्यांनी त्वरित संबंधित मतदारांना अर्ज करून मतदार यादीतून आपली नावे कमी करण्याच्या सूचना केल्याची माहिती आहे. सुरुवातीला दोन नावे पुढे आली असून अजुन बरेच नावे अशी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मतदार याद्यांचे पुन्हा सर्वेक्षण करून मतदार यादीत चुकीची नावे टाकणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे दिनेश अग्रवाल व सदस्यांनी केली आहे.