गोंदिया : तिरोडा तालुक्यातील बरबसपुरा ग्रामपंचायतीचे सरपंच नरेश असाटी यांना जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी अपात्र ठरवित पदावरून दूर केले होते. असाटी यांनी या निर्णयाविरोधात नागपूर विभागीय अप्पर आयुक्तांकडे अपील केली होती. अप्पर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती देत असाटी यांना सरपंचपदी कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बरबसपुराचे सरपंच नरेश असाटी हे गोंदिया येथील धोटे बंधू कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यामुळेच त्यांना सरपंचपदावरून दूर करण्यात यावे, अशी तक्रार २०१९-२० मध्ये येथील एका ग्रामपंचायत सदस्याने गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी २८ जानेवारीला नरेश असाटी यांनी अपात्र ठरविले होते. दरम्यान, नरेश असाटी यांनी या विरोधात अप्पर आयुक्तांकडे अपिल केले होते. ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम १६(२) अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाविरोधा अप्पर आयुक्तांकडे अपील केले होते. तसेच या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती केली होती. दरम्यान, आयुक्तांनी या प्रकरणावर सुनावणी घेऊन दोन्ही पक्षाची बाजू ऐकून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला १६ फेब्रुवारी रोजी स्थगिती देत असाटी यांना सरपंचपदी कायम ठेवण्याचे आदेश दिले.