राष्ट्रीय महामार्गामुळे आमगावासी तहानलेले ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:29 AM2021-04-16T04:29:04+5:302021-04-16T04:29:04+5:30
गोंदिया: गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया येथे देवरी-आमगाव मार्गे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना नियोजनशून्य काम होत असल्यामुळे या मार्गावर बनगाव ...
गोंदिया: गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया येथे देवरी-आमगाव मार्गे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना नियोजनशून्य काम होत असल्यामुळे या मार्गावर बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनला तडा जातो. परिणामी वारंवार हा पाणी पुरवठा बंद होतो.
देवरीपासून आमगाव मार्गे या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. पदमपूरच्या पोवारीटोला ते आमगावच्या महाकाली पेट्रोलपंप पर्यंत या रस्त्यासाठी खोदकाम झाले आहे. रस्ता तयार करताना एका बाजूचा रस्ता तयार करून दुसऱ्या बाजूने प्रवाशांना सहजरीत्या प्रवास करता येईल अशी सोय करायला हवी होती. परंतु तसेच न करता संपूर्ण रस्ता खोदून टाकला. वाटसरूंना जाण्या-येण्यासाठी मुरूम व माती टाकण्यात आली. परंतु मुरूमामध्येही चिकट माती मिश्रीत असल्यामुळे पाण्याने मुरूम ओले होऊन त्यावरून वाहने गेल्यास वाहने घसरतात. परिणामी वाहन चालकांचा अपघात होतो. रस्त्याचे खोदकाम करतांना जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम करण्यात येत असल्याने या रस्त्याच्या बाजूने गेलेली प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन अनेकदा फुटते. त्यामुळे आमगावसह आमगाव तालुक्यातील अनेक गावांचा पाणी पुरवठा खंडित होतो. या प्रकरामुळे आमगावातील जनता तीव्र संताप व्यक्त करीत आहे.
बॉक्स
अनेक ठिकाणी पाईप लाईन फुटली
ह्या महामार्गाचे बांधकाम करतांना बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची मोठी पाईपलाईन अनेकदा फुटली. बांधकाम करतांना जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम करण्यात येत असल्यामुळे जेसीबीने पाईप फोडले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणचा पाणी पुरवठा बंद असतो. मुख्य पाईप लाईन फुटली कि सर्वच गावांचा पाणी पुरवठा बंद होतो. पाईप फुटल्यानंतर हा महामार्ग बनविणारे पाईपची दुरूस्ती करून देतात. परंतु मागील वर्षभरापासून दोन-चार दिवसात पाईप फुटण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे.