रानगव्यांनी केले नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प ‘कॅप्चर’; वन्यप्राणी गणना-२०२३ चा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2023 08:42 PM2023-06-10T20:42:00+5:302023-06-10T20:42:22+5:30

Gondia News नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात कोणत्या प्राण्यांची किती संख्या आहे, याची मोजदाद करण्यासाठी ३ जून रोजी आटोपलेल्या वन्यप्राणी गणना निसर्गानुभव-२०२३ चा अहवाल आला आहे. यामध्ये सर्वाधिक ४२३ रानगव्यांची नोंद घेण्यात आली आहे.

Navegaon-Nagzira Tiger Reserve 'captured' by Rangavya; Report of Wildlife Census-2023 | रानगव्यांनी केले नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प ‘कॅप्चर’; वन्यप्राणी गणना-२०२३ चा अहवाल

रानगव्यांनी केले नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प ‘कॅप्चर’; वन्यप्राणी गणना-२०२३ चा अहवाल

googlenewsNext

गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात कोणत्या प्राण्यांची किती संख्या आहे, याची मोजदाद करण्यासाठी ३ जून रोजी आटोपलेल्या वन्यप्राणी गणना निसर्गानुभव-२०२३ चा अहवाल आला आहे. यामध्ये सर्वाधिक ४२३ रानगव्यांची नोंद घेण्यात आली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर रानडुकरांची नोंद घेण्यात आली आहे. या आकडेवारीवरून मात्र नवेगाव-नागझिरा हे जरी व्याघ्र प्रकल्प असले तरी ते रानगव्यांनीच ‘कॅप्चर’ केले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.


...वन्यप्राण्यांसाठी राखीव करण्यात आलेल्या जंगलांमध्ये कोणत्या प्राण्याची किती संख्या आहे याची मोजणी करण्यासाठी दरवर्षी वन्यप्राणी गणना केली जाते. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ही वन्यप्राणी गणना केली जाते. मात्र यंदा बुद्ध पौर्णिमेच्या सप्ताहात सलग पाऊस बरसला व त्यामुळे ५ मे रोजी वन्यप्राणी गणनेचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर वन्यप्राणी गणनेचा कार्यक्रम ३ जून रोजी घेण्यात आला. यामध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पाणवठ्यांवर हा वन्यप्राणी गणना निसर्गानुभव कार्यक्रम घेण्यात आला होता. या वन्यप्राणी गणनेत सहभागी झालेल्या स्वयंसेवक व वन कर्मचाऱ्यांकडून त्यांना दिसणाऱ्या वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात येते. त्यानुसार, घेण्यात आलेल्या नोंदींचा अहवाल आला आहे.

.... या अहवालानुसार, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक संख्या रानगव्यांची दिसत आहे. कारण, अहवालात सर्वाधिक ४२३ रानगव्यांची नोंद घेण्यात आली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर २१९ रानडुकरांची, तिसऱ्या क्रमांकावर ११९ ठिपके असलेल्या हरणांची तर चवथ्या क्रमांकावर १७७ वानरांची नोंद घेण्यात आली आहे. यानंतर अन्य उर्वरित वन्यप्राण्यांची शंभरच्या आत नोंद असून एकूण १२८४ विविध वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली आहे.

वाघोबाचे दर्शनच नाही
- नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यात आता दोन वाघिणींना सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जंगल सफारीसाठी जाणाऱ्या पर्यटकांनाही वाघोबा दर्शन देत असल्याने पर्यटकांची संख्या वाढल्याचे ऐकिवात आहे. असे असतानाच वन्यप्राणी गणनेत एकाही वाघोबाने दर्शन दिले नसल्याचे दिसते. कारण, वन्यप्राणी गणनेच्या अहवालात एकाही वाघाची नोंद घेण्यात आलेली नाही. मात्र १२ बिबट्यांची नोंद आहे.

७० मचाणांंवरून झाली वन्यप्राणी गणना

- वन्यप्राणी गणनेसाठी नागझिरा पिटेझरी, उमरझरी व कोका येथे ७० मचाण तयार करण्यात आले होते. तर या वन्यप्राणी गणनेत १४२ स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. एका मचाणावर दोन स्वयंसेवक व वनकर्मचारी असे नियोजन करण्यात आले होते. वन्यप्राणी गणनेमुळे व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते.

Web Title: Navegaon-Nagzira Tiger Reserve 'captured' by Rangavya; Report of Wildlife Census-2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.