गोंदिया : ग्रामीण विकासाच्या योजनांचा लाभ गावपातळीवर देण्यासाठी शासन आणि यंत्रणांकडून नियोजन केले जाते. मात्र कितीही नियोजन केले, तरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी आणि गावाचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि गावपातळीवर काम करणाऱ्या यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांची गावाच्या विकासाप्रती चांगली मानिसकता असणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन आदर्श हिवरेबाजारचे माजी सरपंच तथा राज्यस्तरीय आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.जवळील ग्राम कटंगीकला येथे शनिवारी (दि.१९) घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सरपंच मेळावा व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यशाळेत ‘आमचा गाव, आमचा विकास’ या विषयावरील कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी दुसरे प्रमुख मागदर्शक म्हणून नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे उपस्थित होते. पुढे बोताना पवार यांनी, गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी उत्तम आरोग्य, चांगले शिक्षण, शुद्ध पिण्याचे पाणी, चांगल्या प्रकारची शेती आणि गावात सद्भावनापूर्ण वातावरण असणे महत्वाचे आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टीने यंत्रणा ही सक्र ीय असली पाहिजे. ग्रामसभा ही तेव्हाच यशस्वी होते जेव्हा सरपंच, सचिव आणि ग्रामसभेचा प्रत्येक सदस्य स्वत:ला झोकून देऊन विकासाच्या नियोजनाचे काम करतात. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांच्या एकजूटीची आवश्यकता आहे. ग्रामपंचायत ही गावाची मंदीर झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. सर्वसामान्य व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा, आणि पिण्याचे पाणी देणारी व्यवस्था ग्रामपंचायतमधून निर्माण झाली पाहिजे. ग्रामविकासाची कुंडली लोकप्रतिनिधींनी तयार केली पाहिजे. या कुंडलीमध्ये शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, सिंचनाची व्यवस्था आणि रोजगार निर्मितीचे नियोजन असले पाहिजे. तरच ग्रामविकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तर काळे यांनी, जिल्हा रोगराईमुक्त करण्यासाठी आधी डासांचा नायनाट करणे महत्वाचे आहे. सांडपाण्यामुळे डास आणि घाण तयार होते. यावर मात करण्यासाठी डासांच्या अळ््या प्रथम नष्ट केल्या पाहिजे. त्यांचे जीवनचक्र तोडून डासांची उत्पत्ती थांबविली पाहिजे. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी शोषखड्डे तयार केले पाहिजे. गटारे वाहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. गटारे कोरडी असली पाहिजे. गावे गटारमुक्त झाली तर कोट्यवधी रु पयांची बचत होईल असे सांगून ते म्हणाले, शोषखड्यांमुळे पाण्याचा निचरा भूगर्भात होऊन भूजल पातळीत वाढ होण्यास शोषखड्डे उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती समित्यांचे सभापती, उपसभापती, सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच मोठ्या संख्येत उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
विकासासाठी मानसिकता हवी
By admin | Published: March 21, 2016 1:28 AM