पांढरी येथे नेटवर्क सेवा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:28 AM2021-04-16T04:28:59+5:302021-04-16T04:28:59+5:30
मुंडीकोटा येथील बँकेत असुविधा मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील आयडीबीआय बँकेला परिसरातील १५ गावे जोडलेली आहेत. या बँकेत ...
मुंडीकोटा येथील बँकेत असुविधा
मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील आयडीबीआय बँकेला परिसरातील १५ गावे जोडलेली आहेत. या बँकेत चढ-उतार करताना वृद्ध नागरिकांना त्रास होतो. ग्राहकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था नसल्याने अडचण होत आहे. या बँकेचे एटीएमसुद्धा अनेकदा बंद असते. त्यामुळेही ग्राहकांची गैरसोय हाेत आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या समस्या मार्गी लावण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.
बनगाव येथे
घाणच घाण
आमगाव : शहरातील बनगाव येथील प्रभाग क्रमांक ६ मधील नहर रोड, अनिहा नगर व कामठा रोड परिसरात कचराकुंडी नसल्याने घाण पसरली आहे. परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले असून, कचराकुंडी ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वत्र घाण पसरली असून, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याकरिता नगर प्रशासनाने प्रभागात लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
कचराकुंड्यांकडे दुर्लक्ष
गोरेगाव : येथील नगर पंचायतीतर्फे राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा इतरत्र पडून राहू नये, यासाठी चौकाचौकांत कचराकुंड्या बसविण्यात आल्या. मात्र, या कुंड्यांची नियमित सफाई होत नसल्याने त्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. याकडे नगर पंचायतचे दुर्लक्ष होत आहे. नगर पंचायतने लक्ष देत कचराकुंड्यांची सफाई करण्याचा मागणी आहे.
बसस्थानक परिसरातील वाहतुकीची कोंडी
केशोरी : येथील बसस्थानक परिसरातील जागेत खासगी व्यावसायिकांनी दुकाने गाठून शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे परिवहन मंडळाच्या बसेसला परत फिरविण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने बसस्थानकावर वाहतुकीची कोंडी होत आहे. येथील ग्रामपंचायत प्रशासन दुकानदारांचे हित जोपासून अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले
इसापूर : कोरोना संक्रमणामुळे देशात व राज्यात आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. मागील वर्षभरापासून अनेकांचा रोजगार हिरावला आहे. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची नोकरी गेल्याने त्यांना घरी बसण्याची वेळ आली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून बचत केलेले पैसेसुद्धा शिल्लक राहिले नाहीत.
टिल्लू पंपमुळे पाणी मिळणे झाले कठीण
आमगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नळ योजनेवर काही व्यक्ती टिल्लू पंप लावून पाणी खेचत आहेत. त्यामुळे इतर ग्राहकांना मिळणे कठीण झाले. मात्र, टिल्लू पंप लावून पाणी खेचणाऱ्यांवर अद्यापही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शहरवासीयांची समस्या कायम आहे.
ऑनलाईन खरेदीला आला जोर
देवरी : शहरापासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत ऑनलाईन वस्तू खरेदीला कोरोनामुळे जास्त महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसत आहे. पैशांची बचत होत असल्याने नागरिक आता ऑनलाईन वस्तू खरेदी करत आहेत.
रानडुकरांचा हैदोस कोण थांबविणार?
अर्जुनी-मोरगाव : या परिसरातील शेतकरी पिकासाठी राबराब राबून व दिवस-रात्र काबाडकष्ट करून घाम गाळतात. मात्र, रानडुकरे शेतात शिरून पिकांची नासाडी करत आहेत.
वृक्षतोडीनंतर वृक्षांची सर्रास वाहतूक
सडक-अर्जुनी : शेतशिवारासह जंगलात असलेल्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू झाली आहे. अनेकदा अशी वृक्षतोड करताना वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
महिलांना जनधनच्या मानधनाची प्रतीक्षा
गोरेगाव : गरीब महिलांना आर्थिक बळ म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात अनुदान जमा केले होते. मात्र, आता अनुदान जमा झालेले नाही.
कव्हरेजअभावी भ्रमणध्वनी सेवा ठप्प
बोंडगावदेवी : शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात भ्रमणध्वनी ग्राहक आहेत. मात्र, मागील अनेक दिवसांपासून कव्हरेजची समस्या निर्माण झालेली आहे.