नवजात मुलगी हलगर्जीपणामुळे दगावली
By admin | Published: June 4, 2016 01:40 AM2016-06-04T01:40:15+5:302016-06-04T01:40:15+5:30
प्रसूतीनंतर सतत तीन दिवस नवजात मुलीला ताप येत असताना तिला वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने तसेच गोंदियाला वेळेवर रेफर न केल्यामुळे मुलगी दगावली.
कुटुंबीय संतप्त : गावकऱ्यांचा डॉक्टरवर रोष
सालेकसा : प्रसूतीनंतर सतत तीन दिवस नवजात मुलीला ताप येत असताना तिला वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने तसेच गोंदियाला वेळेवर रेफर न केल्यामुळे मुलगी दगावली. त्यामुळे कावराबांध येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू रघटाटे यांच्यावर योग्य कारवाई केल्याशिवाय नवजात मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा संताप मुलीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. त्यांच्या समर्थनात गावकरीसुध्दा आरोग्य केंद्रात धडकले. त्यामुळे कावराबांध येथे चार तास तणावाचे वातावरण होते.
कावराबांध येथील चरणदास राजाराम हटवार यांनी १ जून रोजी पत्नी टिकेश्वर चरणदास हटवार हिला प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध येथे दाखल केले. काही वेळात महिलेची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी गर्भात मूल व्यवस्थित नसून त्याला गोंदियाला घेऊन जावे असा सल्ला दिला. परंतु तेवढ्यात कावराबांध उपकेंद्रातील आरोग्य सेविकेशी संपर्क केला असता तिने मातेची तपासणी करू न प्रसूती सामान्य होणार आहे असे सांगितले.
आरोग्य सेविकेच्या म्हणण्यानुसार प्रसूती सामान्य होऊन मातेने एका गोडस मुलीला जन्म दिला. मात्र सकाळी ७.५० वाजता जन्म झालेल्या मुलीला काही वेळातच ताप आला. त्यावर डॉक्टरने औषधोपचार केला. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा ताप आला. तेव्हा पुन्हा औषधोपचार केल्याचे सांगण्यात आले. तिसरा दिवस लोटला तरी ताप उतरला नाही. सकाळी आईला-मुलीसह गोंदिया रेफर करण्यात आले. परंतु आरोग्य केंद्राचे गाडी चालक हजर नव्हते. डॉक्टरने गाडी चालकाशी संपर्क केला केला. सकाळी ८ वाजेपासून चालकाने कर्तव्यावर असायला पाहिजे. परंतु चालक १० वाजता आरोग्य केंद्रात आला. तत्पूर्वीच ती नवजात मुलगी दगावली. या सर्व प्रकारामुळे हटवार कुटुंबीयांसह इतर गावकरीही संतापले व प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. डॉक्टर आणि गाडी चालकावर कारवाई झाल्याशिवाय मृत मुलीला दवाखान्यातून नेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतले. तालुका वैद्यकीय अधिकारी सी.डब्ल्यू.वंजारे यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत चालकाला कार्यमुक्त करण्याचे आदेश काढायला लावले.