लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लग्नात वधूपित्याकडून हुंडा घेणे वरपक्षासाठी आपला सामाजिक दर्जा उंच दाखविण्याचाच एक प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू होता. या प्रकाराला गेल्या दोन-तीन वर्षांत बराच झटका बसला. आता अनेक वधूपक्ष नव्हे तर वरपक्षांना मुली शोधाव्या लागत आहेत. यातच हुंड्याची अट घातली जात नाही. हुंडा नको, परंतु किमान चैनीच्या व भौतिक वस्तू द्या, अशी मागणीवर पक्ष करीत असल्याने वधूपित्याला महागाईचा फटका बसत आहे. टीव्ही, फ्रीज, कूलर, वॉशिंग मशीन यांसह दैनंदिन गरजेत वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तूंची मागणीवर पक्षाकडील मंडळी लग्न जुळल्यापासूनच करतात. विशेषतः वधू-वरामध्ये याबाबत चर्चा केली जाते. त्यानुसार वस्तू खरेदी केल्या जातात. परंतु गेल्या दोन वर्षांत कोरोनाकाळ असताना विविध वस्तूंच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने याचा आर्थिक फटका वधूपित्यालाच मोठ्या प्रमाणात बसत असल्याचे दिसून येते.
हा खर्च २५ टक्क्यांनी वाढला दोन वर्षांपूर्वी मिळणाच्या चैनीच्या व भौतिक वस्तूंच्या किमतीत जवळपास आठ ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय लग्नासाठी लागणाऱ्या विविध वस्तू, डेकोरेशन आदींचेही दर वधारले असल्याने एकूणच लग्नाचा खर्च २५ टक्क्यांनी वाढला आहे.
टीव्हीचे दर ७ टक्क्यांनी कमीमागील वर्षीच्या तुलनेत टीव्हीचे दर ७ ते १० टक्क्यांनी कमी झाले आहेत. गोंदियात पाच हजारांपासून दोन लाखांपर्यंत टीव्ही उपलब्ध आहे.
फ्रीजही महागमागील वर्षीच्या तुलनेत फ्रीजच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या बाजारपेठेत १० हजारांपासून तीन लाखांपर्यंत फ्रीज मिळते.
हुंडा नको, एवढे साहित्य द्या
- वरपक्षाकडून वधूपित्याकडे बेड, फ्रीज, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन, गॅस शेगडी यांसह विविध प्रकारच्या वस्तू मागितल्या जातात. - लग्न जुळल्यापासूनच वर मुलगा वधू मुलीकडे याबाबत मागणी रेटून धरतो. आपल्या सुखी संसारासाठी या भौतिक व चैनीच्या वस्तू आवश्यक असल्याचे आवर्जून सांगत असल्याने वधूसुद्धा वस्तूंची जुळवाजुळव करते.
मे महिन्यातील मुहूर्त
मे महिन्यात बुधवार दि.४, मंगळवार दि. १०, शनिवार १४, बुधवार २८. शुक्रवार २०, शनिवार २९, रविवार २२, बुधवार २५, गुरुवार २६, शुक्रवार २७ आदी दिवशी विवाह मुहूर्त आहेत.
ऑनलाइन माध्यमातून वस्तू खरेदी करण्याचा ग्राहकांचा कल अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढला. अनेक जण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूसुद्धा ऑनलाइन मागवतात. त्यामुळे दुकानातील विक्रीवर थोडा परिणाम झाला आहे. विवाह समारंभासाठी ग्राहक बाजारपेठेतूनच वस्तू खरेदी करीत होते. परंतु आता ही पद्धत सुद्धा बदलून गिफ्ट पॅकेज खरेदी करण्याची संकल्पना समोर आल्याने प्रत्यक्ष खरेदीलाही फारसा प्रतिसाद मिळत नाही.- राकेश अग्रवाल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेता