लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यावर्षी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शॉर्ट सर्कीट होऊन १० निष्पाप बालकांचा बळी गेला होता. ही अंत्यत दुर्दैवी घटना असून या घटनेची भविष्यात पुनरावृत्ती जिल्ह्यात होऊ नये म्हणून सर्व शासकीय कार्यालयातील फायर ऑडिट लवकरात लवकर करा, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. शनिवारी (दि. २७) स्थानिक एन.एम.डी.महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. सहेषराम कोरोटे, महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता गोंदिया वासनिक, अधीक्षक अभियंता गोंदिया सम्राट वाघमारे, अधीक्षक अभियंता भंडारा राजेश नाईक, कार्यकारी अभियंता गोंदिया वानखेडे, कार्यकारी अभियंता देवरी फुलझेले, महापारेषणचे अधीक्षक अभियंता अणे, गोंदिया विभागाचे मुख्य अभियंता आनंद जैन, गोंदिया महावितरणचे जनसंपर्क अधिकारी अविनाश साखरे उपस्थिती होते.कृषिपंप वीज जोडणी धोरण-२०२० अंतर्गत अर्जदारांचे कृषिपंप वीज जोडणीची प्रकरणे प्रलंबित न ठेवता तातडीने निकाली काढण्यात यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा लाभार्थ्यांना लाभ देण्याचे निर्देश दिले. आमदार कोरोटे म्हणाले, ककोडी येथे विद्युत वितरणचे सब स्टेशन तयार कण्यात यावे, जेणेकरून त्या भागातील नागरिकांची विद्युत पुरवठ्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. यासाठी आदिवासी विकास मंत्रालयाकडून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी राऊत यांच्याकडे केली. प्रास्ताविकातून अधीक्षक अभियंता सम्राट वाघमारे यांनी विद्युत विभागामार्फत गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक ऊर्जा विकास योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, पूर्व विदर्भ योजना, कृषिपंप उच्चदाब वितरण प्रणाली योजना, मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना, कृषीपंप वीज जोडणी धोरणांची माहिती दिली.
भूमिगत लघुदाब विद्युत वाहिनीचे लोकार्पण- गोंदिया येथील मनोहरभाई कॉलनी येथे शनिवारी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते भूमिगत केलेल्या लघुदाब विद्युत वाहिनीचे लोकार्पण करण्यात आले. ही भूमिगत विद्युत वाहिनी ४ कि.मी.पर्यंत राहणार असून त्याचा लाभ परिसरातील ग्राहकांना होणार आहे. भविष्यात संपूर्ण गोंदिया शहरात भूमिगत विद्युत वाहिनी निर्मिती करण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.