सालेकसा : कोरोना काळानंतर तब्बल ११ महिन्यांनंतर शाळा गजबजू लागल्या. त्यातच आश्रमशाळांत विद्यार्थी निवासी असल्याने त्यांची तपासणी गरजेची आहे. शासनाच्या आदेशानुसार आश्रमशाळांनी आरोग्य यंत्रणेकडे विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी पत्रव्यवहारदेखील केला. परंतु, विविध कारण पुढे करून वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य यंत्रणा कानाडोळा करीत आहेत. हा प्रकार जिवावर बेतणारा असून, त्याला जबाबदार कोण राहणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, असे पत्र आदिवासी विकास विभाग आणि शालेय विभागाने दिले. तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थी निवासी असतात, त्या आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र आरोग्य अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. आश्रमशाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासंदर्भात अनुदानित कचारगड आदिवासी माध्यमिक आश्रमशाळेने (पिपरीया) दरेकसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना दि. १० फेब्रुवारी रोजी पत्र लिहून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याची मागणी केली. त्यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागालादेखील पत्राची प्रत पाठविली.
पत्र व्यवहार करून सात दिवस लोटले असतानादेखील दरेकसा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी केली नाही. त्यांच्याशी शाळेच्या मुख्याध्यापकांनी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता आमच्याकडे वेळ नाही व कर्मचारी नाहीत. आम्हाला दुसरीही कामे आहेत, असे सांगितले. सध्या कोरोनाचा काळ आहे. दुसऱ्या लाटेत आता कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत, असे असतानादेखील आरोग्य यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एखाद्या विद्यार्थ्यांला कोरोनाची बाधा असल्यास संपूर्ण आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनादेखील हा प्रकार माहिती असताना त्यांनीदेखील दुर्लक्ष केल्यामुळे साथीच्या आजारांकडे बघण्याचा आरोग्य यंत्रणेचा दृष्टिकोन काय आहे, हे दिसून येत आहे.
--------------------
आयुर्वेदिक रुग्णालय कुलूपबंद
पिपरीया येथे आयुर्वेदिक रुग्णालय आहे. या रुग्णालयात एकही कर्मचारी उपस्थित नाही. त्यामुळे रुग्णालय कुलूपबंद अवस्थेत आहे. आठवड्याला वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून तपासणी करणे गरजेचे असताना जंगलव्याप्त आणि आदिवासीबहुल भागाचा लाभ आरोग्य यंत्रणा घेत असल्याचे दिसून येत आहे.