एकाही फेरीवाल्याची नोंद नाही; मदत कुणाला मिळणार? (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:28 AM2021-04-15T04:28:14+5:302021-04-15T04:28:14+5:30
गोंदिया : राज्यात कोरोना रुग्णवाढ चिंताजनक वेगाने हाेत असल्याने कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ब्रेक द ...
गोंदिया : राज्यात कोरोना रुग्णवाढ चिंताजनक वेगाने हाेत असल्याने कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत १५ दिवसांची संचारबंदी सुरू केली आहे. १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजेपासून तर १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीमुळे तळहातावर कमावून खाणाऱ्या फेरीवाल्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक फेरीवाल्याला १५०० रुपये मदत देण्याचे जाहीर केले; परंतु शहरात एकाही फेरीवाल्याची नोंद नाही. त्यामुळे हा लाभ कुणाला देणार, असा प्रश्न पडला आहे.
राज्य सरकारने कोरोना रोखण्यासाठी उचललेले पाऊल योग्य आहे; परंतु या संचारबंदीचा फटका गरीब आणि कष्टकरी वर्गाला बसतो. यासाठी मुख्यमंत्र्यांनी ५४७६ कोटींची विशेष मदत जाहीर केली. या मदतीचा एक भाग राज्यातील पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी १५०० रुपये दिले जाणार आहेत; परंतु गोंदिया जिल्ह्यात फेरीवाल्यांची नोंदणीच नसल्याने फेरीवाल्यांची मदत कुणाला मिळणार, असा प्रश्न आहे. गोंदिया जिल्ह्यात एक हजारावर फेरीवाले आहेत; परंतु त्यांची नाेंदणीच केली नसल्याने मदत कुणाला मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बॉक्स
काय समस्या...
आधी १५ दिवस आणि आता १५ दिवस म्हणजेच महिनाभर काम बंद राहणार असल्याने तळहातावर कमावून खाणाऱ्या लोकांची चांगलीच समस्या झाली आहे. कुणी उसनवारीवर साहित्य द्यायला तयार नाही.
......
फेरीवाले काय म्हणतात
मी १५ दिवसांपासून १ रुपयाही कमावला नाही. त्यामुळे घरातील लोकांचे पोट कसे भरावे, हा प्रश्न आहे. घराबाहेर गेले तर कोरोनाची भीती. घरात राहिले तर उपाशी राहण्याची भीती आहे. शासनाने मदत तर जाहीर केली; परंतु आम्हाला मिळते की नाही, ते माहिती नाही.
- रोहीनाथ सदगीर, फेरीवाला
........
कोरोनाला पाहून संचारबंदी लागली; पण आमच्या समस्या वाढतच आहेत. हातात पैसा नाही, कामही नाही त्यामुळे पोट कसे भरावे हा प्रश्न आहे. शासनाची मदत मिळेल की नाही माहिती नाही. कशी मिळेल आणि केव्हा मदत मिळेल हे कुणास ठाऊक.
- विठ्ठल पाथोडे, फेरीवाला
.........
कोरोनाला आळा घालण्यासाठी संचारबंदी लावणे आवश्यक आहे; परंतु कमावून खाणाऱ्या लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटविणे तेही अत्यावश्यक आहे. सरकारने फेरीवाल्यांना १५०० रुपये मदत देण्याचे ठरविले; परंतु आम्ही फेरीचे काम करून कुठेच नोंदणी केली नाही. त्यामुळे मदत मिळणार की नाही हे सांगता येत नाही.
- संजयसिंह पुरोहित, फेरीवाला