गोंदिया: लग्नाला पाच वर्ष झालीत परंतु पतीने पत्नीला आपले नाव दिले नाही. आधार कार्डवर नवऱ्याचे नाव लिहू दिले नाही, लग्नाची नोंदही केली नाही. स्वत: इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये नोकरीवर असूनही त्याने आपल्या सर्व्हीसबुकवर पत्नीचे नावही लिहीले नाही. माहेरून ५ लाख रूपये आण अन्यथा घरात राहू नकाेस अशी तंबी पत्नीला देणाऱ्या पतीविरूध्द पत्नीने पोलिसात तक्रार केली. यासंदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंदिया तालुक्याच्या मोरवाही येथील रोशनी मुकेश ठाकरे (२४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी पती मुकेश सुखदेव ठाकरे (३८) हा इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये नोकरीवर आहे. रोशनीचे मुकेश सोबत २० जानेवारी २०१९ ला रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. पत्नीला मोरवाही येथे घरीच ठेऊन तो पाच वर्षापासून आपल्या नोकरीवर एकटाच राहतो. वर्षातून एखाद्या महिन्याकरीता गावी आल्यावर तो पत्नीशी वेळ घालवितांनाही तिला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या लग्नाला पाच वर्ष उलटली असतांनाही त्याने अजूनही लग्नाची नोंदणी केली नाही. पत्नीचा आधारकार्ड तयार केला नाही. आपल्या सेवापुस्तीकेत रोशनीच्या नावाची नोंदही केली नाही.
मुकेश नोकरीवर असतांना रोशनीला सासरा सुखदेव लक्ष्मण ठाकरे (७६), सासू सत्यभामा सुखदेव ठाकरे (६२), भासरा ओमप्रकाश सुखदेव ठाकरे (४५) व दिर वाल्मीक सुखदेव ठाकरे (३०) हे सर्व तिला त्रास द्यायचे. मुकेश घरी आल्यावर रोशनीच्या विरोधात वाट्टेल ते सांगून ते आपली पोळी शेकायचे. यातून त्यांच्या संसारात कलह निर्माण झाला. परिणामी या प्रकरणाची तक्रार गोंदिया ग्रामीण पोलिसात करावी लागली. पोलिसांनी पाचही आरोपींवर भादंविच्या कलम ४९८ (अ), ३४ अन्वये गुन्हा दाखल दाखल केला आहे.बैठकीतच नव्हे चक्क पोलिसांसमोरही बायकोला ठेवण्यास नकाररोशनीला पत्नीचा अधिकारी न देणाऱ्या पतीला समज देण्यासाठी गावात बैठक घेण्यात आली. परंतु मुकेशने तिला पत्नीचा अधिकार देण्यास चक्क नकार दिला. हे प्रकरण भरोसा सेल गोंदिया येथे गेल्यावर त्याने रोशनीला अधिकार देणे सोडा आता आपल्या घरी ठेवण्यास नकार दिला आहे.