कुत्र्यांच्या नसबंदीनंतरही संख्या वाढतीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:29 AM2021-01-23T04:29:29+5:302021-01-23T04:29:29+5:30
बेवारस कुत्रे आजघडीला शहरवासीयांसाठी डोकेदुखीची बाब बनले आहे. शहरातील प्रत्येकच भागात बेवारस कुत्र्यांचे कळप हमखास बघावयास मिळतात. कुत्र्यांची ही ...
बेवारस कुत्रे आजघडीला शहरवासीयांसाठी डोकेदुखीची बाब बनले आहे. शहरातील प्रत्येकच भागात बेवारस कुत्र्यांचे कळप हमखास बघावयास मिळतात. कुत्र्यांची ही वाढती संख्या बघता, धोकाही तेवढाच वाढत चालला आहे. कारण हे बेवारस कुत्रे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या मागे धावतात. विशेष म्हणजे, लहान मुलांच्या मागे धावत असल्याने, कित्येकदा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर नगरपरिषदेने सन २०१८ मध्ये अमरावती येथील लक्ष्मी इंस्टिट्यूट अँड ॲनिमल वेल्फेअर या एजंसीला कंत्राट दिले होेते. यासाठी नगरपरिषदेने ७०० रुपये प्रती कुत्रा या दराने तेव्हा २,००० कुत्र्यांची नसबंदी करवून घेतली होती.
-----------------------------
विशेष यंत्रणा नाहीच
शहरातील बेवारस कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपरिषदेकडे विशेष यंत्रणा किंवा काही कर्मचारी ठरवून देण्यात आलेले नाहीत. पूर्वी कुत्र्यांना मारता येत होते. मात्र, आता कुत्र्यांना मारू नये, असे आदेश असल्याने नगरपरिषद कुत्र्यांना मारू शकत नाही. परिणामी, कुत्र्यांची संख्या वाढतीच आहे. हेच कारण आहे की, शहरातील प्रत्येकच भागात आता बेवारस कुत्र्यांचे कळप दिसून येत आहेत.
--------------------------
अंडरग्राउंड रस्ता बनला धोकादायक
बेवारस कुत्र्यांची समस्या अवघ्या शहरालाच भेडसावत आहे. यात मात्र, शहरातील अंडरग्राउंड रस्ता मात्र अत्यंत धोकादायक बनला आहे. येथे मोठ्या संख्येत कुत्रे असून, रस्त्याने ये-जा करणाऱ्यांच्या मागे ही धावत असल्याच्या तक्रार आहेत.
--------------------------
२-४ तक्रारी रोजच्याच
बेवारस कुत्रे नागरिकांच्या मागे धावतात, ही बाब आता काही नवी राहिलेली नाही. असे झाल्यास कित्येक जण त्याकडे दुर्लक्ष करतात, तर काही मोजकेच नगरपरिषदेकडे तक्रार देतात. यामुळे रोजच्या २-४ तक्रारी येत असल्याचे नगरपरिषदेतून कळले. मात्र, कुत्र्यांना मारता येत नसल्याने त्यांचेही हात बांधलेले आहेत.
-------------------------------
बेवारस कुत्र्यांबाबत तक्रारी येत आहेत. हा विषय आता स्वच्छता विभागाकडून नगरपरिषदेच्या सभेत मांडला जाणार आहे. सभेत काय निर्णय घेतला जातो, त्यानुसार पुढे काय ते ठरवता येईल.
- गणेश हतकय्या, स्वच्छता निरीक्षक, गोंदिया