गोंदिया : शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग आटाेक्यात येत आहे. तर बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ही दुप्पटच असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ३३८ वर आली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे समाधानकारक चित्र आहे.
गोंदिया जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट आता १० टक्केच्या आतच आहे. त्यामुळेच जिल्ह्याचा समावेश येलो झोनमध्ये आहे. मात्र, यानंतरही जिल्हावासीयांनी बिनधास्त न राहता सतर्क राहून काळजी घेण्याची गरज आहे. तरच जिल्हा लवकर कोरोनामुक्त होईल. त्यामुळे जिल्हावासीयांनी स्वत:ची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेत गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. जिल्ह्यात कोरोनाला उतरती कळा लागली असून कोरोना बाधितांचा ग्राफ पुन्हा वाढू नये यादृष्टीने काळजी घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात सोमवारी (दि.३१) ८७ बाधितांनी कोरोनावर मात केली तर ५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. १ बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने १६४६६५ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १३९८०३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १५८२१९ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १३७३६२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४०७१७ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ३९६९० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ३३८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
................
१६७७ नमुन्यांची चाचणी ५२ पॉझिटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गोंदिया येथील प्रयोगशाळेत १२८९ आरटीपीसीआर तर ३८८ रॅपिड अँटिजन नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५२ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्याचा पॉझिटिव्हीटी रेट ३.१० टक्के आहे. कोरोनाचा रिकव्हरी दर ९७.४८ टक्के असून मृत्यूदर १.६१ टक्के आहे.
......
लसीकरणाला आली गती
कोरोनावर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण हे सुध्दा तेवढेच गरजेचे आहे. जिल्ह्यातील १४० लसीकरण केंद्रावर सध्या लसीकरणाची माेहीम राबविली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत २ लाख ४६ हजार ४४७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
..............
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला होणार सुरुवात
जिल्ह्यात १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. ही मोहीम सर्व १४० केंद्रांवरून राबविली जाणार आहे. यासंदर्भातील सूचना सुध्दा आरोग्य विभागाला शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत.
..........