तालुक्याचा भार प्रभारी अधिकाऱ्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 10:41 PM2018-08-01T22:41:22+5:302018-08-01T22:43:18+5:30
तालुक्यातील अनेक महत्त्वपूर्ण विभागातील अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. मात्र यानंतरही शासन आणि प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांची समस्या कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील अनेक महत्त्वपूर्ण विभागातील अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. मात्र यानंतरही शासन आणि प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांची समस्या कायम आहे.
येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, अधीक्षक, गटशिक्षणाधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, सहायक कार्यक्रम अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी चोपा, मंडळ कृषी अधिकारी गोरेगाव, बालविकास प्रकल्प अधिकारी, नगर पंचायत मुख्याधिकारी, दुय्यम निबंधक, कारागीर बहुउद्देशीय संस्था सचिव, सहाय्यक भूमि अभिलेख अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आदी महत्त्वाच्या पदावर प्रभारी अधिकारी कार्यरत आहेत. विशेष म्हणजे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून खरीप हंगाम सुरू आहे. त्यामुळे कृषी विभागाशी आणि पंचायत समितीशी नागरिक व शेतकऱ्यांना नेहमी काम पडते. मात्र अधिकारीच नसल्याने त्यांची कामे होत नसल्याचे चित्र आहे. गावाचा विकास साधण्यासाठी व गरजू व्यक्तीना आवश्यक सवलतीचा लाभ घेण्यासाठी पदाधिकारी, नागरिक, विद्यार्थी यांचा या कार्यालयाशी नियमित संबंध येतो. मात्र अनेक महत्त्वपूर्ण पदावर प्रभारी अधिकारी कार्यरत असल्याने त्यांना निर्णय घेताना अडचण निर्माण होत आहे. ही बाब अनेकदा तालुक्यातील नागरिकांनी शासन आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र त्यांनी याची अद्यापही दखल घेतली नाही.
लाभार्थी प्रतीक्षेत
गोरेगाव तालुक्याची दोन विधानसभा क्षेत्रात विभागणी होवून दोन आमदार या तालुक्याला लाभले आहेत. त्यांनी आपआपल्या क्षेत्राचा विकास करण्याचा प्रयत्न केला. पण अंमलबजावणी करणारे प्रभारी अधिकारी असल्याने विकास कामे रखडली आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही मावा तुडतुडा, अतिवृष्टी, दुष्काळी निधीचा मोबदला अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे लाभार्थी प्रतीक्षेत आहेत.