लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. यामुळे शहरातील काही भागांमध्ये कुत्र्यांचे झुंडचे झुंडच तयार झाले आहेत. या कुत्र्यांकडून रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांमागे एवढेच नव्हे तर वाहनांमागे धावण्याचे प्रकार घडत आहेत. यात चारचाकी वाहनांचे तर ठिक मात्र पायी जात असलेले तसेच दुचाकीने जात असलेल्या नागरिकांसाठी धोक्याची बाब आहे.अशात एखादा व्यक्ती या कुत्र्यांच्या तावडीत आल्यास त्याला कुत्रा चावा घेतात. सुमारे २०-२५ वर्षांपूर्वी नगर परिषदेकडून बिथरलेल्या व मोकाट कुत्र्यांना मारले जात होते. मात्र कुत्र्यांना मारू नये असा कायदा आल्याने आता नगर परिषदेचे हात बांधल्या गेले आहेत.परिणामी शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यांचा हैदोसही वाढत चालला आहे. मध्यंतरी नगर परिषदेने शहरातील सुमारे २००० कुत्र्यांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करविली होती. मात्र एवढे प्रमाण पर्याप्त नसल्याने शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
कुत्रे पकडण्याची व्यवस्था नाहीचनगर परिषदेकडून पुर्वी मोकाट कुत्र्यांना मारले जात होते. मात्र कायद्यानुसार आता कुत्र्यांना मारता येत नाही. परिणामी नगर परिषदेकडून मारण्याचे काम बंद करण्यात आले आहे. शिवाय मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी नगर परिषदकडे व्यवस्था नाही.
वन विभागाची लागते परवानगीकित्येक वर्षांपुर्वी कुत्र्यांना पकडून नेवून जंगलात सोडले जात असल्याची माहिती आहे. मात्र कायदा आल्याने कुत्र्यांना मारता येत नाही. मोकाट कुत्र्यांना पकडून जंगलात सोडताही येत नाही. कुत्र्यांना जंगलात सोडण्यासाठी वन विभागाची परवानगी घ्यावी लागते अशी माहिती आहे. शहरात कुत्रे पकडले जात नाही. शहरातील अंडरग्राऊंड परिसर मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत अत्यधिक धोकादायक बनला आहे. येथे कुत्र्यांचे झुंड नेहमीच दिसून येते. शिवाय मटन मार्केट परिसर, विवेकानंद कॉलनी, छोटा गोंदिया यासह अन्य काही भागांत कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून हा परिसर धोकादायक बनला आहे.
सुमारे २०-२५ वर्षांपूर्वी नगर परिषद कुत्र्यांना मारत होती. मात्र कायदा आल्याने कुत्र्यांना आता मारता येत नाही. नगर परिषदेकडे कुत्र्यांना पकडून इतरत्र सोडण्याची व्यवस्था नाही. मध्यंतरी शहरातील २००० कुत्र्यांची निबीर्जीकरण शस्त्रक्रीया करण्यात आली.- गणेश हतकय्या,आरोग्य निरीक्षक, न.प. गोंदिया
छोटा गोंदिया परिसरासह शहरातील अन्य भागात सध्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढलेली दिसत आहे. रात्रीला हे कुत्रे ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या मागे धावतात. मध्यंतरी काहींना चावा घेण्याची घटना ही घडली आहे. त्यामुळे नागरिक दहशतीत राहतात.- महेश पंधराम, छोटा गोंदिया.