गोंदिया : जागतिक पालक दिन व आंतरराष्ट्रीय बालदिन म्हणून १ जून हा दिवस साजरा केला जातो. यंदा पहिल्या वर्गाकरिता ऑनलाइन प्रवेश सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पहिल्या वर्गात ७ हजार ७०८ विद्यार्थ्यांचे ऑनलाइन ॲडमिशन करण्यात आले आहे.
२० मे ते १५ जून २०२१ दरम्यान इयत्ता पहिलीकरिता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आपली मुले शिकली पाहिजेत, असे प्रत्येक पालकांना वाटते. जागतिक पालक दिनाच्या निमित्ताने सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना १ जून २०२१ ला अधिक संख्येत शाळेत दाखल करायचे आहे. पालक म्हणून आपली जबाबदारी महत्त्वपूर्ण आहे. कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या निर्देशाप्रमाणे सन २०२१-२२ मध्ये शाळा सुरू होतील. आपले मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता आपण आपल्या पाल्यांना शाळेत दाखल करावे, असे आवाहन मुलांना ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने शिक्षण देऊन तसेच विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण केली जात आहे. सन २०२०-२१ मध्ये शाळाबाहेरची शाळा, शाळा बंद, पण शिक्षण सुरू, ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा, ऑनलाइन स्टडी, गृहमाला, भरारी, टिली-मिली, एक गाव एक बालरक्षक, मिशन शिक्षण हमी पत्रक, मिशन वीटभट्टी असे विविध उपक्रम शिक्षण विभागाने राबवून विद्यार्थ्यांचे नाते शाळेशी टिकवून ठेवले आहे. शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्येसुद्धा अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कुठलाही खंड पडू दिला जाणार नाही. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, सर्वांगीण शिक्षणासाठी, बौद्धिक विकास तसेच चांगले नैतिक मूल्ये रुजविण्याच्या दृष्टीने जागतिक पालक दिन व आंतरराष्ट्रीय बालदिनी आपल्या पाल्यांचे नाव पहिल्या वर्गात ऑनलाइन दाखल करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी केले आहे.
...........................
पहिल्या वर्गात ऑनलाइन प्रवेश घेतलेले तालुकानिहाय विद्यार्थी
तालुका ---------शाळा संख्या--------प्रवेश विद्यार्थी संख्या
अर्जुनी-माेरगाव---- ८५-------------- १०७४
आमगाव------------ ७२-------------- ७३३
देवरी---------------- ७६-------------- ५९६
गोंदिया------------ १४४-------------- २०७४
गोरेगाव------------ ६५-------------- ७३६
सडक-अर्जुनी--------- ८१-------------- ९५२
सालेकसा------------ ६५-------------- ५८४
तिरोडा------------ ८३-------------- ९५८
आमगाव-----------६७१-------------- ७७०८
......................................