गोंदिया : रबी हंगामातील धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन सातबारा नोंदणी करण्याची मुदत होती; पण कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना सातबारा ऑनलाइन करता आला नव्हता. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. मात्र, अन्न व नागरी पुरवठा विभागाने बुधवारी (दि.१९) धान विक्रीसाठी ऑनलाइन सातबारा नोंदणीला ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
जिल्ह्यात यंदा रबी हंगामात ६६ हजार हेक्टरवर रबीची लागवड करण्यात आली होती. शेतकरी रबी धानाची विक्री जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर करतात. यंदा रबी हंगामातील धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी या विभागाने सातबारा या विभागाच्या संकेतस्थळावर ३० एप्रिलपर्यंत नोंदणी करण्यास शेतकऱ्यांना सांगितले होते. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शेतकऱ्यांना सातबारा ऑनलाइन नोंदणी करता आला नव्हता. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. हीच बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी चार दिवसांपूर्वीच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. तेव्हा त्यांनी सुद्धा सकारात्मकता दाखवीत मुदतवाढ देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर बुधवारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने रबी धानाची विक्री शासकीय धान खरेदी केंद्रावर करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा ३१ मे पर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्यास मुदतवाढ दिली आहे. यामुळे गोंदिया भंडारा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रबी धान खरेदी त्वरित सुरू करण्यासाठीसुद्धा खा. प्रफुल्ल पटेल व माजी आ. राजेंद्र जैन प्रयत्नरत आहेत.