४२३ गावांत यंदा एकच गणपती
By admin | Published: August 23, 2016 11:57 PM2016-08-23T23:57:09+5:302016-08-23T23:57:09+5:30
गणेशोत्सवाचे प्रणेते बाळ गंगाधर टिळक यांनी १२५ वर्षापूर्वी गणेशोत्सवाला सुरूवात केली.
गोंदिया : गणेशोत्सवाचे प्रणेते बाळ गंगाधर टिळक यांनी १२५ वर्षापूर्वी गणेशोत्सवाला सुरूवात केली. त्यांच्या कार्याची ओळख आजच्या तरूण पिढीला होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक गणेशोत्सवाला लोकमान्य उत्सव म्हणून राबवायचे ठरविले. या उत्सवात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेच्या ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेला पाठबळ मिळणार आहे. जिल्ह्यात यंदा ४२३ गावांत ही संकल्पना राबविली जात आहे.
गहात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू होण्यापूर्वी एका गावात अनेक गणेश मूर्ती असायच्या. त्यातून आपल्या मंडळाचा देखावा आकर्षक असावा, आपल्याच कार्यक्रमांना लोकांनी प्रतिसाद द्यावा, आपल्या मंडळाची मूर्ती जास्त आकर्षक असावी अशा भावनेतून गणेश उत्सव मंडळांमध्ये चढाओढ असायची. यातूनच गावातील अनेक गणेश मंडळांचे वाद व्हायचे. यामुळे गावाची शांतता धोक्यात येत होती. या उत्सवादरम्यान गावाची शांतता अबाधित राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना जिल्ह्यातील ४२३ गावांत राबविली जात आहे. संपूर्ण जिल्हावासीयांना प्रतीक्षा लागलेल्या गणेशोत्सवाला ५ सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. जिल्हाभरात यावर्षी ९३५ सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येत आहे. ४ हजार ६६० खासगी मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे.
एक गाव एक गणपतीची संकल्पना आमगाव, सालेकसा, गोंदिया शहर, गोंदिया ग्रामीण, रावणवाडी, गोरेगाव, तिरोडा, गंगाझरी, दवनीवाडा, डुग्गीपार, देवरी, चिचगड, अर्जुनी/मोरगाव, केशोरी, नवेगावबांध या पोलिस ठाण्यांतर्गत राबविण्यात येत आहे. गोंदिया शहर पोलिस ठाण्यांतर्गत केवळ एका गावात ही संकल्पना साकारली जात आहे. गोंदिया ग्रामीण ठाण्यांतर्गत २० गावांत, रावणवाडीमधील २८ गावांत, तिरोडा ठाण्यातील २५ गावांत, दवनीवाडा ठाण्यांतर्गत १४ गावात, गंगाझरीतील २२ गावांत, आमगावमधील २८ गावांत, सालेकसामधील ६० गावांत, गोरेगावमधील २५ गावांत, देवरी ४१ गावात, चिचगड ४५ गावांत, डुग्गीपारमधील ३८ गावात, नवेगावबांध ठाण्यातील १९ गावात, अर्जुनी-मोरगाव ठाण्यांतर्गत ३६ गावात आणि केशोरी ठाण्यांतर्गत २१ गावात ‘एक गाव एक गणपती’ स्थापन करण्यात येणार आहेत.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेच्या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. एक गाव एक गणपतीच्या माध्यमातून लोकोपयोगी व जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करून गावाला शांततेतून समृध्दीकडे नेण्याचा मानस तंटामुक्त गाव समित्यांनी व्यक्त केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
उत्सवात मंडळांना बक्षिसांची खैरात
यंदा गणेशोत्स साजरा करणाऱ्या गणेश मंडळांना तालुकास्तरापासून विभाग स्तरापर्यंत प्रथम, द्वितीय व तृतीय अशी बक्षीसे देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर प्रथम २५ हजार, द्वितीय १५ हजार व तृतीय १० हजार रूपये, जिल्हास्तरावर स्तरावर प्रथम एक लाख, द्वितीय ७५ हजार व तृतीय ५० हजार रूपये, विभागीय स्तरावर प्रथम २ लाख, द्वितीय १ लाख ५० हजार व तृतीय १ लाख रूपये बक्षीस दिले जाणार आहे.
या आधारावर सामाजिक उपक्रम
या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या स्वदेशी, साक्षरता, व्यसनमुक्ती, बेटी बचाओ व जलसंवर्धन यापैकी एका कल्पनेशी निगडीत देखावा करावा लागणार आहे. सामाजिक उपक्रमातून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यासंदर्भात मंडळांनी आपल्या तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज करायचा आहे. २९ जुलै ते २९ आॅगस्ट यादरम्यान अर्ज स्वीकारले जाणार आहेत.