गोंदिया: शासन मान्यता प्राप्त वैद्यकीय परवाना नसताना (विना रजिस्ट्रेशन) गोरेगाव येथे हॉस्पिटल चालविणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर २१ मार्च रोजी कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात गोरेगाव पोलिस व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी केली आहे. नितेश बाजपेयी असे बोगस डॉक्टरचे नाव आहे.
२१ मार्च २०२४ रोजी गोरेगाव येथील वैद्यकीय अधिक्षक यांनी गोरेगावात बोगस डॉक्टर औषधोपचार करीत असल्याची तक्रार जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे केली. त्या बोगस डॉक्टरकडे कुठलाही शासन मान्यता प्राप्त वैद्यकीय परवाना नसताना (विना रजिस्ट्रेशन) तो हॉस्पिटल चालवित होता. यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना देवुन कारवाईसाठी मदत करण्याची विनंती केली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी आपले पोलीस पाठवून शल्य चिकित्सक डॉ. मोहबे, वैद्यकीय अधीक्षक गोरेगाव यांच्यासह पोलीस पथकाने गोरेगाव येथील डॉ. नितेश बाजपेयी याच्या हॉस्पिटल येथे पोहचून रजिस्ट्रेशन परवाना बाबत विचारले.
त्या ठिकाणी असलेल्या नर्स स्टाफ कडून कोणत्याही प्रकारचा रजिस्ट्रेशन परवाना नसल्याबाबत सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. या हॉस्पिटलमध्ये एक महिला दाखल होती. तिच्यावर विना पात्रता धारक डॉक्टरद्वारे ( बोगस डॉक्टर द्वारे) औषधोपचार सुरू होते. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन नव्हते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय पटले यांनी रितसर कारवाई केली. या बोगस डॉक्टरविरूध्द वैद्यकीय अधीक्षक विजय पटले यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी महाराष्ट्र मेडीकल प्रॅक्टीसनर ॲक्ट १९६१ चे कलम ३३ (२) ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक भुसारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुजित घोलप करीत आहेत.