उत्तरपत्रिका जतन करुन ठेवण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:26 AM2021-04-19T04:26:05+5:302021-04-19T04:26:05+5:30
केशोरी : दरवर्षी राज्य परीक्षा मंडळ दहावी-बारावीच्या बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी-मार्च या महिन्यात घेत असतो. परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावाने लांबणीवर ...
केशोरी : दरवर्षी राज्य परीक्षा मंडळ दहावी-बारावीच्या बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी-मार्च या महिन्यात घेत असतो. परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावाने लांबणीवर गेल्यामुळे केंद्र शाळांना प्राप्त झालेल्या कोऱ्या उत्तरपत्रिका कस्टडीत जतन वजा सांभाळून ठेवण्याची जबाबदारी केंद्र शाळांवर देण्यात आल्याचे आदेश दि.१६ रोजी विभागीय सचिव माधुरी सावरकर यांनी जारी केले आहे.
बारावीची परीक्षा २३ एप्रिल आणि दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार वेळापत्रक सुध्दा जाहीर करण्यात आले होते. परंतु राज्यावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे सदर परीक्षा पुढे ढकलून जूनमध्ये घेणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्र्यांनी केली आहे. त्या आधी एप्रिल महिन्यात परीक्षा घेण्याचे जाहीर केल्यामुळे नागपूर विभागीय मंडळाने गोंदिया, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर येथे प्रतिनिधी पाठवून केंद्र संचालकांना परीक्षेचे साहित्य वाटप करुन टाकले आहे. त्या पाठोपाठ केंद्र शाळांना कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्रॉफ, मॅप, होलोक्राप्ट, स्टिकर, सिटिंग प्लॅन, एबी लिस्ट, विषयनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य, ओएमआर गुणपत्रिका इत्यादी साहित्याचे वाटप करुन विभागीय मंडळ मोकळे झाले आहे. पुढील संभाव्य परीक्षा माहे मे, जून २०२१ मध्ये होणार असल्याने आता हे साहित्य केंद्र संचालकांनी स्वत:च्या कस्टडीत जपून ठेवावे. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत संबंधित उपकेद्रांना साहित्याचे वाटप करु नये. तूर्त आपले परीक्षणातील कपाटात सिलबंद करुन ठेवावे सदर साहित्याचा दुरुपयोग व गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश विभागीय मंडळाच्या सचिव माधुरी सावरकर यांनी (दि.१६) रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
....
केंद्र संचालकांची वाढली धाकधूक
यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्राची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात त्याच शाळेत परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. यामुळे अनेक केंद्र संचालकांची धाकधूक वाढली आहे. हे मात्र निश्चित एकीकडे कोरोनाचे नियम पाळून परीक्षार्थ्यांची बैठक व्यवस्था आणि उपकेंद्र संचालकांना परीक्षा संचालनासंबंधी आवश्यक सूचना देणे यासाठी चांगलीच धावपळ करावी लागणार आहे.