काम बंद करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 09:56 PM2018-06-15T21:56:59+5:302018-06-15T21:56:59+5:30
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम.राजा दयानिधी यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सुरु असलेल्या विविध ठिकाणच्या कामावर गुरूवारी (दि.१४) आकस्मिक भेट देवून तपासणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम.राजा दयानिधी यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सुरु असलेल्या विविध ठिकाणच्या कामावर गुरूवारी (दि.१४) आकस्मिक भेट देवून तपासणी केली. त्यामुळे ग्रामसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सालेकसा तालुक्यातील सातगाव ग्रा.पं. अंतर्गत साखरीटोला येथील स्मशान भूमी मैदान सपाटीकरणाचे काम सुरु करण्यात आले. कामावर आकस्मिक भेट देवून मुख्य कार्यकारी अधिकारी एम. राजा दयानिधी यांनी सर्वांनाच अचंबित केले. कामावर उपस्थित सर्व मजुरांच्या हजेरी पटानुसार हजेरी घेण्यात आली. त्यानंतर ग्रा.पं. कार्यालयास भेट देवून कामाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यात स्मशान भूमी मैदानाचे सपाटीकरण नियमानुसार करता येत नाही, असे सांगून काम बंद करण्याचे तोंडी आदेश देण्यात आले.
मात्र मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी ग्रा.पं.ने नियमित ठराव पाठविला होता. त्याला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतरच स्मशानभूमी मैदान सपाटीकरणाचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांनी सदर काम चुकीचे असल्याचे सांगितले. तेच काम इतर ठिकाणी करावे, असेही सुचविले. त्यासाठी पं.स.चे खंडविकास अधिकारी खाडे यांना फोनवरुन काम बंद करण्याविषयी सूचना करण्यात आली. इकडे काम बंद झाल्याने कामावरील सर्व मजूर ग्रा.पं. कार्यालयावर धडकले व जाब विचारू लागले.
या वेळी उपस्थित उपसरपंच पृथ्वीराज शिवणकर यांनी मजुरांची समजूय काढली व लवकरच दुसऱ्या ठिकाणी काम सुरू करण्यात येईल, असे सांगितले. मात्र काम बंद केल्याने मजूर चांगलेच संतापले होते.
याविषयी पं.स.सालेकसाचे खंड विकास अधिकारी खाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सीईओ यांनी सदर कामाला भेट दिली व चुकीचे काम असल्याने सदर काम बंद करुन दुसºया ठिकाणी सुरू करावे, असी सूचना दिल्याचे सांगितले. ग्रामसेवक संतोष कुटे यांनी दुसरे मस्टर मंजूर करुन दुसरे काम सुरू करू, असे सांगितले. मात्र सीईओंच्या भेटीमुळे तालुक्यातील बरेच ग्रामसेवक हादरले.