गोंदिया : राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रमअंतर्गत सुरक्षित मातृत्व व बालजीवित्व हमी प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन आरोग्य विभागातर्फे १ ते ७ सप्टेंबर दरम्यान गोंदियातील सर्व ग्रामीण रुग्णालयांतून प्रधानमंत्री मातृत्व वंदना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी दिली.
गोंदिया जिल्ह्यातील ८ ग्रामीण रुग्णालये, तिरोडा उपजिल्हा रुग्णालय व बाई गंगाबाई महिला रुग्णालय येथे मोठ्या प्रमाणात गर्भवती महिला नोंदणी व उपचारासाठी येतात. केंद्र शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना बऱ्याच महिलांना माहिती नसतात. त्यामुळे आता राज्य शासनातर्फे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत प्रथमत: गर्भवती मातेला तिच्या औषधोपचारासाठी व पौष्टिक आहारासाठी सुमारे पाच हजार रुपयांच्या लाभाच्या योजनेचे १०० टक्के कार्यान्वयन करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. अशी माहिती आरएमओ डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी दिली. या जनजागरण सप्ताहाचे उद्घाटन १ सप्टेंबर रोजी तालुका पातळीवर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयातून केले जाणार आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर जसे नगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावर लोकप्रतिनिधी, सामाजिक नेते, स्वयंसेवी महिला प्रतिनिधी यांच्यासोबत बैठका आयोजन करून या मातृत्व वंदन योजनेचा लाभ जास्तीत - जास्त महिलांना कसा देता येईल. याबाबत कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
.........
अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मदत
गर्भवतींना आधार लिंक केलेले बँक अकाऊंट किंवा पोस्टल अकाऊंट उघडून देण्यासाठी आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत व्यापक प्रमाणात मदत केली जाणार आहे. कुणा गर्भवती लाभार्थ्यांच्या काही ‘करेक्शन क्यू’ असेल तर तेसुद्धा या कॅम्पमध्ये निराकरण केले जाणार आहे. तरी प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना या महत्त्वाकांक्षी वैयक्तीक लाभ योजनेचा सर्व पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. सुरक्षित मातृत्व व बाल जीवित्व हमी प्रकल्प शंभर टक्के यशस्वी करावा, असे आवाहन अर्बन माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले आहे.