गोंदिया : रब्बी हंगामातील धानाची कापणी आणि मळणी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यातच राज्य शासनाने जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळच्यावतीने संचालित आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. अशात येत्या २-३ दिवसात हे धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यास भारतीय जनता पक्ष किसान आघाडीच्यावतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार, असा इशारा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे यांनी दिला आहे.
जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. मागील वर्षीच्या खरीप हंगामातील धान पिकाचे बोनस अद्यापही मिळालेले नाही. त्यातच रब्बी हंगामातील धान कापणीला आले असून अनेक शेतकऱ्यांचे कार्य अंतिम टप्प्यात आहेत. यापूर्वीच राज्य शासनाने प्रशासनाला आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र कोरोना संसर्गाचे कारण पुढे करून अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू करण्यास दिरंगाई होत आहे. यामुळे पुन्हा शेतकरी खासगी दलालांच्या जाळ्यात फसण्याची दाट शक्यता आहे. त्वरित धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, रब्बी हंगामातील धान पिकालाही बोनस देण्यात यावे तसेच शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे, अशा विविध मागण्या असून या मागण्यांची त्वरित पूर्तता न झाल्यास भाजप किसान आघाडीच्यावतीने जिल्ह्यात रस्त्यावर उतरून आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा टेंभरे यांनी प्रसिद्धी दिला आहे.