तिरोडा : मागील काही दिवसांपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशात शहरात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, नगरपरिषदेने अद्यापही शहरात डासनाशक फवारणी केली नसल्याने शहरवासीयांमध्ये असंतोष व्याप्त आहे.
शहरात मागील महिनाभरापासून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त आहे. स्थानिक नगरपरिषद आणि आरोग्य विभागाने समन्वयातून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे. कोरोनाची दुसरी लाट पसरत असताना, शासनाकडून त्यावर योग्य उपाययोजना, प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. शासनाच्या आदेशानुसार, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय व लसीकरणासाठी येथील नगरपरिषद प्रशासन आणि आरोग्य विभाग आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडत नसल्याचे चित्र आहे. शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, नगरपरिषदेने संपूर्ण डासनाशक फवारणी करण्याची मागणी आहे, अन्यथा शहरात कोरोनासह इतर साथरोगात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.