दुर्लक्षितपणामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 05:00 AM2020-05-22T05:00:00+5:302020-05-22T05:00:30+5:30
जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने युध्द पातळीवर उपयायोजना केल्या. पहिला कोरोना बाधीत रुग्ण कोरोना मुक्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली होती. तसेच मुंबई, पुणे, हैद्राबाद, तेलगंणा येथून रेल्वे मार्गाने पायी येणाºया मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील मजुरांकडे जिल्हा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तब्बल ३९ दिवस कोरोनामुक्त असल्याने ग्रीन झोनमधील जिल्ह्यात मंगळवारी दोन रुग्ण आढळल्याने जिल्हा ग्रीन झोनमधून आॅरेंज झोनमध्ये परार्वतीत झाला. तर गुरूवारी (दि.२१) तब्बल एकाच दिवशी जिल्ह्यातील २६ रुग्णांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा दोन वरुन आता २८ वर पोहचला आहे. बाहेरील राज्य आणि जिल्ह्यांमधून येणाऱ्या स्थलांतरित मजुरांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याची ओरड आता होत आहे.
जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने युध्द पातळीवर उपयायोजना केल्या. पहिला कोरोना बाधीत रुग्ण कोरोना मुक्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली होती. तसेच मुंबई, पुणे, हैद्राबाद, तेलगंणा येथून रेल्वे मार्गाने पायी येणाऱ्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील मजुरांकडे जिल्हा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. जिल्ह्यातील सीमा तपासणी नाक्यावर सुध्दा कठोरपणे तपासणी केली जात नव्हती. त्यामुळेच कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता वाढली होती. लोकमतने सुध्दा याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न देखील केला होता. अखेर मुंबई येथून ट्रकने आलेल्या अर्जुनी मोरगाव ५० मजुरांपैकी १ मजुराला कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी त्याचा स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट झाले. त्यामुळेच या मजुरांसह आलेल्या इतर ४९ मजुरांना गोंदिया जिल्हा क्रीडा संकुल येथील क्वारंटाईन कक्षात दाखल करण्यात आले होते. तर बुधवारपर्यंत जिल्ह्यातील तीन आयसोलेशन कक्षात १३२ रुग्णांवर उपचार सुरू होता. तर ९६ जणांचे स्वॅब नमुने घेवून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाले असून यात तब्बल २६ जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे दोन दिवसात जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २८ पोहचली असून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरूवारी कोरोना बाधीत आढळलले २६ कोरोना बाधीत हे अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील आहे. या भागात आता उपाय योजना केल्या जात आहे.
वाढता प्रादुर्भाव रोखणार कसा
शासनाने राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या मजूर आणि नागरिकांना त्यांच्या स्वगृही जाण्याची परवानगी दिली.तर मुंबई, पुणे येथून अजुनही बरेच मजूर पायीच आपल्या स्वगृही पोहचत आहे. केवळ शासनाच्या संकेत स्थळावर नोंदणी करणाऱ्यांची माहिती जिल्हा प्रशासनाकडे आहे. मात्र जो मजूर पायीच आपल्या स्वगृही पोहचत आहे त्यांची माहिती प्रशासनाकडे नसल्याने त्यांना क्वारंटाईन केले जात नाही. त्यामुळे थेट आपल्या घरी जात असून यामुळेच कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.
आता जिल्हा कोणत्या झोनमध्ये
गोंदिया जिल्हा तब्बल ३९ दिवस कोरोनामुक्त असल्याने ग्रीन झोनमध्ये होता. मात्र मंगळवारी जिल्ह्यात दोन कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा ग्रीन झोनमधून आॅरेंज झोनमध्ये परार्वतीत झाला. त्यानंतर गुरूवारी तब्बल एकाच दिवशी जिल्ह्यात २६ कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २८ पोहचली आहे. त्यामुळे जिल्हा आता नेमका कोणत्या झोनमध्ये आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरी व ग्रामीण भागात संचारबंदी लागू
जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल २६ कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनात सुध्दा खळबळ उडाली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात सायंकाळी ७ ते सकाळी या कालावधीत फौजदारी संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी गुरूवारी सायंकाळी उशीरा काढले. त्यामुळे या कालावधीत बाहेर पडण्यास मनाई केली आहे. केवळ अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडता येईल.
आयसोलेशन कक्षात १७७ जण
जिल्ह्यातील चार आयसोलेशन कक्षात १७७ जणांवर उपचार सुरू आहे. सात क्वारंटाईन कक्षात ८३ जण दाखल आहेत. यात चांदोरी ४, लईटोला ५ तिरोडा १३, उपकेंद्र बिरसी ७, जलाराम लॉन ४, आदिवासी आश्रमशाळा ईळदा-४३ आणि डवा येथील सामाजिक न्याय विभागाच्या आश्रमशाळेत ७ असे एकूण ८३ जण उपचार घेत आहेत. तर १२६ वर स्वॅब नमुन्यांचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त व्हायचा आहे.