लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यावरील प्राणवायूचे संकट टाळण्यासाठी अदानी विद्युत प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून १३ केएल क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील ऑक्सिजन प्राणवायूचे संकट टळून रुग्णांची गैरसोय टळण्यासही मदत झाली आहे.
एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ऑक्सिजन आणि बेडची समस्या निर्माण झाली होती. ऑक्सिजनअभावी कोविड रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण झाली होती. हे गंभीर संकट ओळखत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या आयनॉक्स कंपनीच्या संचालकांशी बोलून तातडीने ४० टन लिक्विड ऑक्सिजन जिल्ह्याला उपलब्ध करुन दिले. तसेच ऑक्सिजनच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी अदानी विद्युत प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात १३ केएल क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यासंदर्भात अदानी समूहाचे गौतम अदानी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी याला लगेच हिरवा झेंडा दिला. त्यामुळे तीन महिन्यात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यास मदत झाली. १३ केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक लावण्यात आले असून, हा प्लांटदेखील सुरळीतपणे सुरु झाला आहे. त्यामुळे मेडिकल आणि केटीएस रुग्णालयातील २०० बेडना नियमित ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य झाले आहे. तसेच ऑक्सिजन टँकमुळे दोन दिवसांच्या ऑक्सिजनचा स्टॉक करुन ठेवणे शक्य झाले. याबद्दल खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अदानी समूहाचे गौतम अदानी यांचे आभार मानले आहेत. जिल्ह्यावरील प्राणवायूचे संकट टाळण्यासाठी खासदार पटेल यांनी वेळीच उचललेल्या पावलांबद्दल खासदार प्रफुल्ल पटेल यांचे जिल्हावासीयांनी आभार मानले आहेत. जिल्ह्यातील ऑक्सिजनच्या समस्येसंदर्भात माजी आमदार राजेंद्र जैन यांचासुध्दा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. भंडारा येथील जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हाॅलमध्ये सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर सुरु करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी पत्र दिले आहे.