धान खरेदी केंद्रांना मुहूर्त सापडेना; भंडारा, गाेंदिया जिल्ह्यांतील तीन लाखांहून अधिक शेतकरी प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2022 11:06 AM2022-11-03T11:06:50+5:302022-11-03T11:08:17+5:30
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत सर्वाधिक धानाचे क्षेत्र
अंकुश गुंडावार/ ज्ञानेश्वर मुंदे
गोंदिया / भंडारा : गोंदिया आणि भंडारा हे दोन्ही धान उत्पादक जिल्हे असून, या जिल्ह्यांची आर्थिक घडी शेतीवरच आहे. मात्र, यंदा दोन्ही जिल्ह्यांत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली असून, त्यांची आर्थिक कोंडी झाल्याने कंबरडे मोडल्याचे चित्र आहे. पण, यानंतरही शासनाला धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मुहूर्त सापडत नसल्याने शेतकऱ्यांची मात्र धान विक्री करण्यासाठी धडपड सुरू आहे.
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत सर्वाधिक धानाचे क्षेत्र आहे. गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ७६ हजार हेक्टर, तर भंडारा जिल्ह्यात १ लाख ६१ हजार ४९४ हेक्टर क्षेत्र आहे. दोन्ही जिल्ह्यांत जवळपास ८० लाख क्विंटल धानाचे उत्पादन होते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. खरिपासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, गोंदियाने जिल्ह्यात ९९ धान खरेदी केंद्रांना; तर आदिवासी विकास महामंडळाने ४० धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. तर भंडारा जिल्ह्यात फेडरेशनने ३७ व आदिवासी विकास महामंडळाने १८ धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे.
मागील दोन-तीन वर्षांपासून सातत्याने धान खरेदीतील घोळ पुढे येत आहे. त्यामुळे रब्बी हंगामापासून धान खरेदी केंद्रांवर धानाची नोंदणी करण्यासाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी अनिवार्य करण्यात आली होती. यासाठी गोंदिया जिल्ह्यातील ६५ हजार व भंडारा जिल्ह्यातील ४९ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. सर्व धान खरेदी केंद्रे दिवाळीपूर्वीच सुरू होणे अपेक्षित होते; कारण शेतकरी दिवाळीपूर्वी हलक्या धानाची कापणी आणि मळणी करून त्याची विक्री करून दिवाळसण साजरा करतात. मात्र, यंदा अवकाळी पाऊस आणि वेळेत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना दिवाळी अडचणीतच गेली.
खरेदीच्या उद्दिष्टाने होतोय विलंब
यंदाच्या रब्बी हंगामापासून शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाला किती धान खरेदी करावी, याचे उद्दिष्ट बुधवारी (दि. २) ठरवून देण्यात आले. गोंदिया जिल्ह्याला ३९ लाख, तर भंडारा जिल्ह्याला ३७ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे यानुसार मंजुरी दिलेल्या खरेदी केंद्रांना धान खरेदी करण्याचे टार्गेट दिले जाणार आहे. परिणामी, धान खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रक्रिया आणखी लांबण्याची शक्यता आहे.
... तर शेतकरी व्यापाऱ्यांच्या दारात
अद्यापही जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. तर खरिपातील हलके धान मोठ्या प्रमाणात विक्री करण्यासाठी बाजारपेठेत येत आहे; पण खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना तो खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विक्री करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांसह कृत्रिम संकटालाही तोंड द्यावे लागत आहे.
गोसेच्या बॅकवाॅटरने धानपीक सडू लागले
सदोष सर्वेक्षणामुळे संपादित न केलेल्या शेतात गोसे प्रकल्पाचे बॅकवाॅटर शिरले आहे. त्यामुळे भंडारा तालुक्यातील अनेक शेतशिवारांत उभे धान शेतातच सडू लागले आहे. गतवर्षी दीडशे हेक्टर क्षेत्रातील धान बॅकवाॅटरने बाधित झाले होते. यंदा भंडारा तालुक्यातील दवडीपार, कोरंभी, टाकळी, खमाटा, बेला, उमरी, सालेबर्डी, खैरी या गावांतील शेतांमध्ये पाणी शिरले आहे. सुमारे ५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतात पाणी असल्याने कापणी खोळंबली असून धान शेतातच सडत आहे.
दृष्टिक्षेपात भंडारा, गाेंदिया
- दोन्ही जिल्ह्यांतील एकूण लागवड क्षेत्र : ३ लाख ३६ हजार हेक्टर
- दोन्ही जिल्ह्यांतील खातेदार शेतकरी : ५ लाख ३४ हजार
- आतापर्यंत नोंदणी केलेले शेतकरी : १ लाख ९ हजार
- दोन्ही जिल्ह्यांतील मंजूर धान खरेदी केंद्रे : १७७
- दोन्ही जिल्ह्यांत सुरू झालेली खरेदी केंद्रे : ०