रिक्षाचालकांच्या पळवापळवीने प्रवाशांचा वाढला वैताग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:32 AM2021-09-22T04:32:12+5:302021-09-22T04:32:12+5:30
गोंदिया : आजघडीला सर्वांनाच आपापल्या कामाची घाई राहत असून यामुळे आता एसटी किंवा रेल्वेतून उतरल्यावर नागरिक रिक्षा ठरविण्यापेक्षा ...
गोंदिया : आजघडीला सर्वांनाच आपापल्या कामाची घाई राहत असून यामुळे आता एसटी किंवा रेल्वेतून उतरल्यावर नागरिक रिक्षा ठरविण्यापेक्षा थेट ऑटोरिक्षा पकडून निघून जातात. परिणामी आता बघावे तेथे मोजकेच रिक्षा दिसत असून ऑटोरिक्षावाल्यांचीच चलती दिसून येत आहे. परिणामी शहरात मोठ्या प्रमाणात ऑटोरिक्षांची संख्या वाढली आहे. या ऑटोरिक्षावाल्यांना शहरात काही ठिकाणी थांबा देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही ते आपल्या मर्जीने रिक्षालावून प्रवासी नेतात. शिवाय नियमांना तोडून ते ऑटो चालवित असल्याच्याही तक्रार येतात. यात आपल्या मर्जीने भाडे ठरवून कित्येकदा एकमेकांचे प्रवासी पळविणे आदी प्रकार घडत असून, यातून त्यांचे आपसातच भांडण होत असल्याचेही दिसून येते. विशेष म्हणजे, रिक्षावाल्यांना भाडे ठरवून देण्यात आले नसल्याने ते आपल्या मर्जीने प्रवाशांकडून भाडे घेतात. अशात कित्येकदा दुसरा रिक्षावाला कमी भाड्यात प्रवाशांना सोडून देतो. तर कुणी जास्त पैसे घेत असल्याने प्रवाशांना मात्र या प्रकारामुळे वैताग आला आहे.
------------------------------
या ठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी
-बसस्थानक, मरारटोली
शहरातील हे मुख्य बसस्थानक असून येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी मिळणार यामुळे या परिसरात ऑटोरिक्षावाल्यांची चांगलीच गर्दी असते. कित्येकदा येथे प्रवाशांना घेऊन वादविवादही होताना दिसतात.
----------------------
-रेल्वेस्थानक
शहरातील रेल्वेस्थानक परिसर हे दुसरे प्रवासी मिळविण्याचे केंद्र असल्याने येथेही मोठ्या प्रमाणात रिक्षावाल्यांची गर्दी असते. काही ठरावीक गाड्यांच्या वेळेला श्री टॉकीज चौक परिसरातही गर्दी होत असल्याने वाहतुकीलाही अडचण होते.
--------------------------
-नेहरू चौक परिसर
शहरातील हृदय स्थळ असलेल्या नेहरू चौकातील उड्डाण पुलाखाली रिक्षावाल्यांचा थांबा असतो. येथून शासकीय कार्यालय तसेच अन्यत्र जाण्यासाठी प्रवासी मिळत असल्याने रिक्षावाले गर्दी करतात.
----------------------------
प्रवाशांना त्रास
शहरातील थांब्यांवर असलेले रिक्षावाले एकाच ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे भाडे घेतात. यामुळे नेमके कुणाच्या गाडीत जावे हे कळत नाही. कित्येकदा त्यांची आपसातच जुंपते. त्यांना शहरातील परिसरनिहाय भाडे ठरवून देण्याची गरज आहे.
- प्रवीण रहांगडाले
-------------------------------
एकाच थांब्यावर असलेले रिक्षावाले प्रवाशांकडून एकाच परिसरात जाण्यासाठी वेगवेगळे भाडे घेतात. यामुळे त्यांचे भाडे ठरलेले दिसत नाही. काही प्रवाशांना कमी भाडे पडते तर तेथेच जाणाऱ्या दुसऱ्या रिक्षावाल्याकडून जास्त भाडे घेतले जाते.
- योगेश ठाकरे
-------------------------------
मनमानी भाडे
१) शहरात रिक्षावाल्यांना काही थांबे ठरवून देण्यात आले आहेत. मात्र यानंतरही ते आपल्या मर्जीने जेथे प्रवासी मिळणार असे वाटते तेथे जाऊन उभे होतात.
२) हे चुकीचे असून काही रिक्षावाले मनमानी भाडे आकारून प्रवासी उचलून नेतात व यामुळे तेथे पूर्वीपासून राहणारे रिक्षावाले चिडतात.
३) काही रिक्षावाले प्रवासी मिळावे यासाठी कोठूनही प्रवासी घेतात आपल्या मर्जीने भाडे ठरवितात. यामुळे अन्य रिक्षावाल्यांचे नुकसान होत असल्याने वादावादीही होते.
----------------------------
थांबा आहे तेथेच रहावे
रिक्षावाल्यांना थांबा ठरवून देण्यात आला असून त्यांनी थांब्यावरच राहण्याची गरज आहे. अन्यत्र आपला रिक्षा लावून गर्दी व वाहतुकीला अडचण करू नये. आता रिक्षावाल्यांना गणवेश घालणे सक्तीचे केले असून असे न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- युवराज हांडे, निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया.