संतोष बुकावन
अर्जुनी मोरगाव : विद्यार्थ्यांच्या पळवापळवीसाठी आता शाळाशाळांत द्वंद्वयुद्ध पेटले आहे. आता काही शाळांच्या स्टुडंट पोर्टलच्या पासवर्डशी छेडछाड होत असल्याचा गंभीर प्रकार घडत असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. पोर्टलच्या पासवर्डशी नेमका कोण छेडछाड करतो हा संशोधनाचा विषय आहे.
तालुक्यात बोगस विद्यार्थ्यांचा सद्या सुळसुळाट आहे. अनेक शाळांत एकच विद्यार्थी दोन शाळांत असल्याचे प्रकार आहेत. दरवर्षी ३० सप्टेंबरला विद्यार्थी पटनिर्धारण होत असते. या आधारावरच संच व शिक्षक मान्यता पदे ठरत असतात. पटसंख्या कायम राखण्यासाठी आता शाळांचा आटापिटा सुरू आहे. बोगस विद्यार्थी भरतीचा पर्दाफाश झाल्यानंतर अधिकच गंभीर प्रकार व्हायला सुरुवात झाली आहे. शासनाच्या शिक्षण विभागाने ३० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करण्याचे फर्मान सोडले आहे. यामुळे बोगस विद्यार्थ्यांचे बिंग फुटत आहे. आधारकार्ड अपडेट करताना अनेक विद्यार्थी आणखी कुठल्यातरी दुसऱ्या शाळेत शिकत असल्याचे पोर्टलवर संदेश येत आहेत. एखाद्या शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत प्रविष्ठ असल्यास रिक्वेस्ट पाठवावी लागते. ही रिक्वेस्ट दुसऱ्या शाळेने कन्फर्म करायची असते. त्याशिवाय शाळा बदल झाल्याचे पोर्टलवर दिसत नाही. ज्या शाळेत बोगस विद्यार्थी आहेत त्या शाळा आता संकटात सापडल्या आहेत. त्यामुळे पासवर्डशी छेडछाड करण्याचा अदभूत प्रकार आता होऊ घातला आहे. ज्या शाळेत आपल्या शाळेतील एखादा विद्यार्थी आहे. त्या शाळेचा पासवर्ड हस्तगत करायचा. आपल्या शाळेतील पासवर्ड आपल्याला माहिती असतोच. दोन्ही शाळेचे पासवर्ड असल्याने पोर्टल उघडून आपणच रिक्वेस्ट पाठवायची व दुसरा पोर्टल उघडून रिक्वेस्ट कन्फर्म करायची असे षडयंत्र सद्या सुरू आहेत. बुधवारी काही शाळांनी आपल्या शाळेचे पोर्टल उघडले तेव्हा पासवर्डशी छेडछाड झाल्याचा प्रकार लक्षात आला. दोन-तीनदा पासवर्ड रिसेट करूनही असाच प्रकार होत असल्याचे एका शिक्षकाने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. परिसरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक मिळून या गंभीर प्रकाराची गटशिक्षणाधिकारी यांचेकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
.............
अधिकाऱ्याचे मौन
तालुक्यात बोगस विद्यार्थ्यांचा सुळसुळाट सुरू असताना अधिकाऱ्यांचे मौन हा चर्चेचा विषय आहे. अजूनपर्यंत साधी चौकशी करण्याचे धाडस अधिकाऱ्यांनी दाखवू नये याचे आश्चर्य वाटते. अधिकारी नुसते सभा घेण्यातच खूश आहेत. विद्यार्थी पळवापळवीसाठी हे असले गंभीर प्रकार करण्यास एकप्रकारे अधिकारीच सवड देत असल्याचे दिसून येते.